महिला टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये आज (१३ ऑक्टोबर) अतिशय महत्वाच्या सामन्यात भारतानाचा ९ धावांनी पराभ झाला. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने शेवटच्या षटकात टीम इंडियाचा धुव्वा उडवला.
उपांत्य फेरी गाठण्याच्या दृष्टिकोनातून हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा होता. दरम्यान, टीम इंडिया अजूनही सेमी फायनलच्या शर्यतीत आहे, पण उपांत्य फेरी गाठण्यासाठी उद्याच्या न्यूझीलंड-पाकिस्तानच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे.
कर्णधार हरमनप्रीत कौर शेवटच्या षटकापर्यंत क्रीजवर राहिली, पण संघाला विजयापर्यंत नेऊ शकली नाही. तिने ४७ चेंडूत ५४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कांगारू संघाने ७ बाद १५१ धावा केल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून नियमित कर्णधार ॲलिसा हिली खेळली नाही, त्यामुळे ताहिला मॅकग्राने नेतृत्व केले. मॅकग्राने या सामन्यात ३२ धावा केल्या आणि त्याच्याप्रमाणेच एलिस पेरीनेही ३२ धावांचे योगदान दिले.
संघाकडून सर्वाधिक धावा ग्रेस हॅरिसने केल्या, तिने ४० धावांची खेळी केली. भारताकडून गोलंदाजीत रेणुका ठाकूर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
भारतासमोर १५२ धावांचे लक्ष्य होते, मात्र भारतीय संघाने ४७ धावांपर्यंत मजल मारत आघाडीच्या तीन फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या. स्मृती मानधना या सामन्यातही अपयशी ठरली, तिने केवळ १२ चेंडूत ६ धावा केल्या. ४७ च्या स्कोअरवर 3 फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी कमान सांभाळली.
हरमनप्रीत आणि दीप्ती यांच्यात ६३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. पण ते भारताला विजयापर्यंत घेऊन जावू शकले नाहीत. कारण ११० धावांवर दीप्ती शर्माची विकेट पडताच ठराविक अंतराने विकेट पडू लागल्या.
एकेकाळी टीम इंडियाने ३ विकेट गमावून ११० धावा केल्या होत्या, पण पुढच्या ३१ धावांमध्ये टीमने ६ विकेट गमावल्या. विशेषत: हरमनप्रीतचे शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धाव घेणे महागात पडले. कारण संघाला ६ चेंडूत १४ धावा हव्या होत्या, तर हरमनप्रीत एकटीच सेट फलंदाज क्रीजवर होती.
भारताकडून हरमनप्रीत कौरने नाबाद अर्धशतक झळकावले. तिने ४७ चेंडूत ५४ धावा केल्या. मात्र, तरीही टीम इंडियाला विजय मिळवता आला नाही. दीप्ती शर्माने २९ धावांचे योगदान दिले.