मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND W Vs AUS W ODI : भारतानं जिंकलेला सामना गमावला, ऑस्ट्रेलियाचा शेवटच्या षटकात ३ धावांनी विजय

IND W Vs AUS W ODI : भारतानं जिंकलेला सामना गमावला, ऑस्ट्रेलियाचा शेवटच्या षटकात ३ धावांनी विजय

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 30, 2023 09:27 PM IST

IND W Vs AUS W 2nd ODI Highlights : भारत आणि ऑस्ट्रेलियन महिला संघांमध्ये ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज (३० डिसेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताचा अवघ्या ३ धावांनी पराभव झाला.

IND W Vs AUS W 2nd ODI Highlights
IND W Vs AUS W 2nd ODI Highlights

India Vs Australia Womens 2nd ODI Scorecard : ऑस्ट्रेलिया महिला संघाने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा अवघ्या ३ धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.

आता दोन्ही संघांमधील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना २ जानेवारीला खेळवला जाणार आहे.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅलिसा हिलीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ८ बाद २५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताला ८ बाद २५५ धावाच करता आल्या.

शेवटच्या षटकात विजयासाठी १२ धावांची गरज होती. पण श्रेयंका पाटील आणि दीप्ती शर्मा यांना या धावा करता आल्या नाहीत.

भारताकडून रिचा घोषने सर्वाधिक ९६ धावा केल्या. तिने ११७ चेंडूत १३ चौकार मारले. तर जेमिमाह रॉड्रिग्जने ४४ धावांचे योगदान दिले. तिने ५५ चेंडूत ३ चौकार मारले.  स्मृती मानधनाने ३४ आणि शेवटी दीप्ती शर्माने ३६ चेंडूत नाबाद २४ धावा केल्या. दीप्तीला शेवटच्या षटकात १२ धावा करता आल्या नाहीत. भारताने शेवटच्या षटकात केवळ ९ धावा केल्या. यात वाईडची एक धाव होती.

तत्पूर्वी, २५९ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली होती. पण यानंतर यास्तिका भाटियाच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला. २६ चेंडूत १४ धावा करून ती एलबीडब्ल्यू आऊट झाली. 

त्यानंतर स्मृती मानधना ३८ चेंडूत ३४ धावा करून बाद झाली. एलाना किंगच्या चेंडूवर मॅकग्राने झेल घेतला. तिसरा धक्का जेमिमाह रॉड्रिग्जच्या रूपाने बसला, ती ५५ चेंडूत ४४ धावा करून बाद झाली. जॉर्जिया बिअरहॅमच्या चेंडूवर ती फोबी लिचफिल्डकरवी झेलबाद झाली. हरमनप्रीत कौर १० चेंडूत ५ धावा करून बाद झाली. बेअरहॅमच्या चेंडूवर अॅलिसा हिलीने तिचा झेल घेतला.

ऑस्ट्रेलियाचा डाव

ऑस्ट्रेलियाकडून फोबी लिचफिल्डने ६३ आणि एलिस पेरीने ५० धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक ५ बळी घेतले.

एलिस पेरीला दीप्ती शर्माने श्रेयंका पाटीलच्या हाती झेलबाद केले. पेरीने ४७ चेंडूंत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५० धावा केल्या.  तर फोबी लिचफिल्ड ९८ चेंडूत ६३ धावा करून बाद झाली. श्रेयंका पाटीलच्या चेंडूवर रिचा घोषने तिचा झेल घेतला.

शेवटी ताहिला मॅकग्रा ३२ चेंडूत २४ धावा, जॉर्जिया वेरेहॅम २२, अॅनाबेल सदरलँड २३ आणि अलाना किंगने झटपट नाबाद २८ धावांचे योगदान दिले आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

WhatsApp channel