sikandar raza will make new world record today : भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील चौथा सामना आज हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात यजमान संघाचा कर्णधार अलेक्झांडर रझाला झिम्बाब्वेसाठी नवा इतिहास रचण्याची संधी आहे.
सिकंदर रझाने आज भारताविरुद्धच्या चौथ्या टी २० सामन्यात जर १७ धावा केल्या तर तो झिम्बाब्वेसाठी टी २० स्पर्धेत २००० धावा करणार पहिला फलंदाज ठरेल. झिम्बाब्वेने २००६ मध्ये पहिला टी २०सामना खेळला होता. तेव्हापासून संघाने एकूण १४८ सामने खेळले आहेत, परंतु झिम्बाब्वेच्या कोणत्याही फलंदाजाला त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत २००० धावांचा आकडा गाठता आलेला नाही.
सिकंदर रझा सध्या या स्पर्धेत १९८३ धावांसह झिम्बाब्वेचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. या धावा त्याने ८९ सामन्यांत २४.७८ च्या सरासरीने आणि १३३.२६ च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. रझा याने या काळात काढलेली सर्वोत्तम धावसंख्या ८७ आहे. त्याने या फॉरमॅटमध्ये झिम्बाब्वेच्या संघासाठी १४ अर्धशतकं लगावली आहेत. जर रझाने आज १७ धावा केल्या तर तो झिम्बाब्वेसाठी इतिहास रचणारा आणि २००० धावा करणारा पहिला फलंदाज ठरणार आहे.
भारताविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत सिकंदर रझाची बॅट आतापर्यंत शांत राहिली आहे. पहिल्या टी २० सामन्यात झिम्बाब्वेने भारताविरुद्ध विजय मिळवला तेव्हा कठीण खेळपट्टीवर रझाने १९ चेंडूत १७ धावा केल्या. यानंतर पुढच्या दोन टी-२० सामन्यात त्याने केवळ ४ आणि १५ धावा केल्या. भारताविरुद्धच्या सामन्यात रझाला अद्याप २० धावांचा टप्पा देखील गाठता आलेला नाही.
आज होणाऱ्या सामन्यात रझाकडे शानदार खेळी खेळून झिम्बाब्वेसाठी इतिहास रचण्याची संधी आहे. या सोबतच जर संघाला त्याने विजय मिळवून दिला, तर या सिरिजमध्ये झिम्बाब्वेचा संघ स्पर्धेत राहणार आहे. ५ सामन्यांच्या या मालिकेत झिम्बाब्वेचा संघ सध्या १-२ ने पिछाडीवर आहे. त्यामुळे आजचा सामना हा रंगतदार होणार आहे.
संबंधित बातम्या