टीम इंडिया आज बुधवारी (१० जुलै) झिम्बाब्वेविरुद्ध ५ टी20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना खेळणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. कारण तिसऱ्या सामन्यापासून अनुभवी ३ खेळाडू संघात जोडले जातील, जे पहिल्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध नव्हते.
अशा परिस्थितीत शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आज एकूण ३ बदल पाहायला मिळू शकतात.
याआधी शिवम दुबे, संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांचीही झिम्बाब्वे मालिकेसाठी निवड झाली होती, परंतु हे तिन्ही खेळाडू २०२४ च्या टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियासोबत होते. वर्ल्ड कप चॅम्पियन टीम इंडिया वेळेवर मायदेशी परतू शकली नाही, ज्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या दोन टी-20 सामन्यांसाठी जितेश शर्मा, हर्षित राणा आणि साई सुदर्शन या तिन्ही खेळाडूंना स्थान देण्यात आले.
आता तिसऱ्या टी-20 आधी शिवम दुबे, संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल टीम इंडियात सामील झाले आहेत. तर अशा परिस्थितीत संघात कोणते बदल पाहायला मिळू शकतात ते जाणून घेऊया.
पहिला बदल साई सुदर्शनच्या रूपात निश्चित आहे, ज्याला दुसऱ्या T20 च्या प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवण्यात आले होते. वेगवान गोलंदाज खलील अहमदच्या जागी सुदर्शनला संघात घेण्यात आले होते.
आता सुदर्शन तिसऱ्या टी-20 साठी भारतीय संघाचा भाग असणार नाही. अशा परिस्थितीत सुदर्शनच्या जागी सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते किंवा डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमदचे पुनरागमन होऊ शकते.
जर जयस्वाल प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील झाला तर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो आणि सलामीची जबाबदारी अभिषेक शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांच्यावर जाऊ शकते.
संघातील दुसरा बदल यष्टिरक्षकाच्या रूपात पाहायला मिळतो. संजू सॅमसन तिसऱ्या T20 मध्ये यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलची जागा घेऊ शकतो. संजू भारताच्या T20 विश्वचषक संघाचा भाग होता. मात्र, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
संघात तिसरा बदल अष्टपैलू शिवम दुबेच्या रूपाने होऊ शकतो. झिम्बाब्वेविरुद्धच्या सुरुवातीच्या दोन्ही T20 सामन्यांमध्ये, वॉशिंग्टन सुंदर अष्टपैलू म्हणून दिसला, आता दुबे त्याची किंवा रियान परागची जागा घेऊ शकतो. दुबेने टी-20 विश्वचषकातील सर्व सामने खेळले.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- अभिषेक शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रियान पराग, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार.
संबंधित बातम्या