टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये भारतीय संघ आज (१२ जून) अमेरिकेविरुद्ध तिसरा साखळी सामना रंगणार आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल, तर न्यूयॉर्कच्या स्थानिक वेळेनुसार, सामना सकाळी १०.३० वाजता सुरू होईल.
दरम्यान, पहिलाच वर्ल्डकप खेळणाऱ्या अमेरिनकेने क्रिकेट जगताला चांगलेच चकित केले आहे. टी20 विश्वचषक २२०४ सुरू होण्यापूर्वी अमेरिकेने बांगलादेशचा मालिकेत पराभव केला होता. त्यानंतर संघाने टी-20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात कॅनडाचा पराभव केला. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध सुपर ओव्हर जिंकून संघाने खळबळ उडवून दिली.
आता अमेरिकन संघ भारताला भिडणार आहे. भारतानेही सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत.
स्किलपासून ते अनुभवापर्यंत भारताचा वरचष्मा आहे. पण असे असूनही अमेरिकेला हलक्यात घेण्याची चूक रोहित सेना करू शकत नाही. येथे आपण अशा ५ अमेरिकन खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यापासून टीम इंडियाला सावध राहण्याची गरज आहे.
आरोन जोन्स या स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. पहिल्या सामन्यात कॅनडाविरुद्ध धमाकेदार फलंदाजी केल्यानंतर त्याने पाकिस्तानविरुद्धही उपयुक्त खेळी खेळली. जोन्स लांब षटकार मारू शकतो. त्यामुळेच भारतीय संघाला त्याच्याबाबत सावध राहण्याची गरज आहे.
अँड्रिस गॉस हा मूळचा दक्षिण आफ्रिकेचा आहे. तो दक्षिण आफ्रिकेत भरपूर क्रिकेट खेळला आहे. गॉसने ६० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४२ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. म्हणजेच कठीण परिस्थितीतही तो फलंदाजी करू शकतो. त्याच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये एक शतक आहे.
सौरभ नेत्रावळकरने भारतात भरपूर क्रिकेट खेळले आहे. तो सूर्यकुमार यादव आणि केएल राहुलचा सहकारी होता. या डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाचा वेग कमी असला तरी तो चेंडू दोन्ही दिशेने स्विंग करू शकतो. अशा स्थितीत भारतीय संघाला त्यांचा सामना करणे सोपे जाणार नाही.
नोस्टुश केन्झिगे हा डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. पॉवरप्लेमध्येही तो गोलंदाजी करू शकतो. अनेकवेळा तो डावाचे पहिले षटक टाकतो. विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही सुरुवातीला फिरकीपटूंविरुद्ध अडकतात. केन्झिगे याचा जन्म अमेरिकेत झाला होता पण तो दीर्घकाळ भारतात राहिला आहे.
अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेलने पाकिस्तानविरुद्ध उत्कृष्ट अर्धशतक झळकावले होते. खेळपट्टीवर उभा राहणारा तो फलंदाज आहे. नासाऊ काउंटी स्टेडियमची खेळपट्टीही त्याच्या फलंदाजीसाठी अतिशय अनुकूल आहे. अशा स्थितीत भारतीय गोलंदाजांनी त्याला लवकर बाद केले नाही तर अडचणी वाढवू शकतो.
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
अमेरिका : स्टीव्ह टेलर, मोनांक पटेल (कर्णधार), अॅरॉन जोन्स, नितीशकुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नोस्तुश केंजिगे, सौरभ नेत्रावळकर, अली खान.
संबंधित बातम्या