टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये आज (१२ जून) अ गटातील अमेरिका आणि भारत आमनेसामने होते. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
यानंतर अमेरिकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद केवळ ११० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने १८.३ षटकात ३ गडी गमावून १११ धावा करत सामना जिंकला. भारताचा हा सलग तिसरा विजय आहे.
भारताच्या या विजयामुळे अडचणीत सापडलेला पाकिस्तानच्या सुपर-८ मध्ये पोहोचण्याच्या आशा कायम आहेत. पण पाकिस्तानला त्यांचा पुढचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. तसेच, अमेरिकने त्यांचा पुढचा सामना मोठ्या फरकाने हरावा, अशी प्रार्थना करावी लागेल.
दरम्यान, अमेरिकेच्या १११ धावांचा पाठलाग करताना एकवेळ भारतीय संघाने ३९ धावांत ३ विकेट गमावल्या होत्या. यानंतर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी लढाऊपणा दाखवत अमेरिकेचा पराभव केला. सूर्याने टी-20 विश्वचषकातील चौथे अर्धशतकही झळकावले. या सामन्यात सूर्याने ४९ चेंडूत नाबाद ५० तर दुबेने ३५ चेंडूत नाबाद ३१ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली.
सूर्या आणि शिवम यांनी चौथ्या विकेटसाठी ६५ चेंडूत ६७ धावांची नाबाद भागीदारी केली. याशिवाय ऋषभ पंतने १८ आणि रोहित शर्माने ३ धावा केल्या. तर विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही. अमेरिकेकडून सौरभ नेत्रावलकरने २ आणि अली खानने १ बळी घेतला.
तत्पूर्वी, या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या अमेरिकन संघाची सुरुवात खूपच खराब झाली. पहिले षटक अर्शदीप सिंगने टाकले, ज्यात अमेरिकेने २ विकेट गमावल्या. यानंतर संघाचा डाव सावरला आणि ८ गड्यांच्या मोबदल्यात ११० धावा केल्या. नितीश कुमारने संघाकडून सर्वाधिक २७ धावा केल्या.
त्याच्याशिवाय स्टीव्हन टेलरने २४ धावा केल्या. तर कोरी अँडरसनला केवळ १५ धावा करता आल्या.
भारतीय संघाकडून वेगवान गोलंदाज अर्शदीपने ९ धावांत ४ बळी घेतले. तर हार्दिक पांड्याला २ विकेट मिळाले. फिरकीपटू अक्षर पटेलने १ विकेट घेतली.