टी-20 विश्वचषक २०२४ संपल्यानंतर, भारतीय संघ आपली पहिली एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.
मात्र या मालिकेपूर्वीच कर्णधारपदाची चर्चा सुरू झाली आहे. कारण या मालिकेदरम्यान सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार असल्याची बातमी आहे, त्यात रोहित शर्माचाही समावेश आहे.
इनसाइडस्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने गेल्या तीन महिन्यांपासून सतत खेळत असलेल्या या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषत: रोहित शर्मा डिसेंबर-जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून नुकत्याच संपलेल्या T20 विश्वचषकापर्यंत सतत क्रिकेट खेळला आहे.
पण, बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की "दोन्ही खेळाडूंची वनडे संघात निवड होण्याची खात्री आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडविरुद्धची ३ वनडे सामन्यांची मालिका त्यांच्यासाठी चांगला सराव असेल. दोन्ही खेळाडू येत्या काही महिन्यांत कसोटी सामन्यांना प्राधान्य देतील कारण भारत सप्टेंबर ते जानेवारी दरम्यान १० कसोटी सामने खेळणार आहे.”
वास्तविक, भारताला बांगलादेशविरुद्ध २ कसोटी सामने, न्यूझीलंडविरुद्ध ३ कसोटी सामने आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ५ कसोटी सामने खेळायचे आहेत. अशा स्थितीत वर्कलोड मॅनेजमेंट करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे निवडकर्ते आणि वरिष्ठ खेळाडूंचे मत आहे.
रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या कर्णधारपदासाठी आघाडीवर असल्याचे दिसत असले तरी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत कर्णधारपद भूषवणाऱ्या केएल राहुलकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.
भारतीय क्रिकेट संघ जुलै आणि ऑगस्ट २०२४ मध्ये श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात ३ टी-20 आणि ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा समावेश आहे.
भारत-श्रीलंका टी-20 मालिका वेळापत्रक: भारतीय संघ पहिला T20 सामना २७ जुलै रोजी श्रीलंकेविरुद्ध, दुसरा २९ जुलै रोजी आणि शेवटचा सामना ३१ जुलै रोजी खेळणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजल्यापासून हे ३ टी-२० सामने खेळवले जातील.
भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिका वेळापत्रक: भारताचा श्रीलंकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना २ ऑगस्टला, दुसरा 4 ऑगस्टला आणि तिसरा सामना 7 ऑगस्टला खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 पासून तीनही एकदिवसीय सामने खेळले जातील.s