Asia Cup 2023: भारताचा तडाखेबाज फलंदाज रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतीय संघानं रविवारी कोलंबोमध्ये इतिहास रचला. आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळण्यात आलेल्या या सामन्यात भारतानं श्रीलंकेविरुद्ध एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह भारतानं आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं. दरम्यान, आशिया चषकाची ट्रॉफी उचलताना भारतीय संघासोबत एक मिस्ट्री मॅन दिसला, ज्याची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
भारतीय संघानं २०१८ नंतर प्रथमच आशिया चषक जिंकले आहे. कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या एकतर्फी सामन्यात भारतानं श्रीलंकेला अवघ्या ५० धावांवर ऑलआउट केले. त्यानंतर ३७ चेंडूत लक्ष्य गाठले आणि १० विकेट्सने विजय मिळवला. सामन्यानंतर बक्षीस समारंभात कर्णधार रोहितने ६ विकेट्स घेणाऱ्या भारताचा युवा गोलंदाज मोहम्मद सिराजचे तोंडभरून कौतूक केले.
आशिया चषकावर नाव कोरल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्य विजयाचा आनंद साजरा करत होते. त्यावेळी रोहित शर्मानं एका व्यक्तीला बोलावून ट्रॉफी त्याच्या हातात सोपवली. यानंतर हा व्यक्ती कोण आहे, असा प्रश्न स्टेडियममधील प्रत्येकाला पडला. सोशल मीडियावरही या मिस्ट्री मॅनची चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती टीम इंडियाचा थ्रोडाऊन स्पेशालिस्ट आहे, ज्यांचे नाव राघवेंद्र उर्फ रघु आहे.
राघवेंद्र राघू हा गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघासोबत आहे. दरम्यान, २०११ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रघू पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आले होते. यानंतर २०१४ पासून भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफचा भाग आहे. मास्टर ब्लास्टर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी रघूचा थ्रोडाउन स्पेशालिस्ट म्हणून संघात समावेश करण्याचा सल्ला दिला होता. या दोघांनी बंगळुरूमधील एनसीएमध्ये रघूच्या थ्रोडाउनचा सामना केला होता.