मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND Vs SA Final Highlight : भारतानं टी-20 वर्ल्डकप जिंकला, फायनलमध्ये आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव

IND Vs SA Final Highlight : भारतानं टी-20 वर्ल्डकप जिंकला, फायनलमध्ये आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव

Jun 29, 2024 07:11 PM IST

भारताने दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला.

IND Vs SA Final T20 World Cup
IND Vs SA Final T20 World Cup (AP)

भारताने दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत ८ गडी गमावून १६९ धावा करता आल्या.

एकवेळ दक्षिण आफ्रिकेने १५ षटकांत ४ गडी गमावून १४७ धावा केल्या होत्या. येथून त्यांचा विजय निश्चित वाटत होता, पण भारतीय गोलंदाजांनी त्यांच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला.

भारत-दक्षिण आफ्रिका क्रिकेट स्कोअर

 

ट्रेंडिंग न्यूज

१९ व्या षटकात ४ धावा

अर्शदीप सिंगने १९व्या षटकात केवळ ४ धावा दिल्या. आता दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ६ चेंडूत १६ धावा करायच्या आहेत. डेव्हिड मिलर १६ चेंडूत २१ धावांवर खेळत आहे. त्याच्यासोबत केशव महाराज ६ चेंडूत २ धावांवर खेळत आहेत. हार्दिक पांड्या भारतासाठी शेवटचे षटक टाकू शकतो.

हेनरिक क्लासेन बाद

हार्दिक पांड्याने १७व्या षटकात हेनरिक क्लासेनला बाद करून भारताच्या आशा उंचावल्या आहेत. क्लासेन २७ चेंडूत ५२ धावा करून बाद झाला. आफ्रिकेला २३ चेंडूत विजयासाठी २५ धावांची गरज आहे. भारतासाठी अडचण अशी आहे की बुमराहकडे फक्त एक ओव्हर शिल्लक आहे.

भारताच्या १७६ धावा

विराट कोहलीच्या ७६ धावा आणि अक्षर पटेलच्या ४७ धावांच्या झंझावाती खेळीमुळे भारताने २० षटकात ७ विकेट गमावत १७६ धावा केल्या आहेत. आता जबाबदारी गोलंदाजांवर आहे.

भारताकडून विराट कोहलीने ५९ चेंडूत ७६ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ६ चौकार आणि २ षटकार आले. तर अक्षर पटेलने ३१ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शिवम दुबेही शेवटी चमकला. त्याने १६ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह २७ धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून ॲनरिक नॉर्खिया आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

महत्वाच्या क्षणी विराट कोहलीचं अर्धशतक

विराट कोहलीने ४८ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने ५० धावा पूर्ण केल्या आहेत. किंग कोहलीचे या विश्वचषकातील हे पहिले अर्धशतक आहे. १७ षटकांत भारताची धावसंख्या ४ विकेटवर १३४ धावा आहे. शिवम दुबे १२ चेंडूत २१ धावांवर खेळत आहे. त्याने २ चौकार आणि १ षटकार मारला आहे.

शिवम दुबेने धावांचा वेग वाढवला

शिवम दुबेने १५व्या षटकात मार्को यान्सेनला षटकार ठोकला. या षटकात एकूण १० धावा आल्या. १५ षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या ४ विकेटवर ११८ धावा आहे. किंग कोहली ४३ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने ४६ धावांवर खेळत आहे. शिवम दुबे ५ चेंडूत एका षटकारासह ९ धावांवर खेळत आहे.

अक्षर-कोहलीने डाव सावरला

भारताच्या १० षटकात ७५ धावा झाल्या आहेत. विराट आणि अक्षरने डाव सावरला आहे. भारत मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत आहे. कोहली ३६ तर अक्षर पटेल २६ धावांवर खेळत आहेत.

त्याआधी अक्षर पटेलने ९व्या षटकात केशव महाराजला शानदार षटकार ठोकला. या षटकात एकूण ९ धावा आल्या.

अक्षर पटेलने षटकार ठोकला

अक्षर पटेलने आठव्या षटकात एडन मार्करामवर शानदार षटकार ठोकला. या षटकात एकूण १० धावा आल्या. ८ षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या ३ विकेटवर ५९ धावा आहे. विराट कोहली २४ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने २९ धावांवर खेळत आहे. तर अक्षर पटेल १३ चेंडूत १ चौकार आणि १ षटकारासह १८  धावांवर खेळत आहे. दोघांमध्ये २१ चेंडूत २५ धावांची भागीदारी आहे.

विराट कोहली मैदानात

विराट कोहली शानदार टचमध्ये दिसत आहे. त्याने आतापर्यंत ४ चौकार ठोकले आहेत. भारताच्या ४ षटकात ३२ धावा असून कोहली २२ धावांवर खेळत आहे.

रोहित-पंत बाद

केशव महाराजने दुसऱ्या षटकात टीम इंडियाला दोन धक्के दिले. रोहित शर्माला बाद केल्यानंतर महाराजने ऋषभ पंतलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पंत शून्यावर बाद झाला. दोन षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन बाद २३ धावा आहे.

भारताची धमाकेदार सुरुवात

दक्षिण आफ्रिकेसाठी मार्को यान्सेनने पहिले षटक टाकले. रोहित शर्माने पहिल्याच चेंडूवर एकेरी घेतली. त्यानंतर विराट कोहलीने कव्हर ड्राइव्हला चौकार मारून सुरुवात केली. तिसऱ्या चेंडूवर किंग कोहलीने फ्लिक शॉट खेळला आणि चौकार वसूल केला. शेवटच्या चेंडूवर कोहलीने समोरच्या बाजूने चौकार मारला. पहिल्या षटकात ३ चौकारांसह एकूण १५ धावा आल्या. विराट ५ चेंडूत १४ धावांवर खेळत आहे. 

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्खिया, तबरेझ शम्सी.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.

भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग ११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही.

अशा परिस्थितीत संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांना पुन्हा एकदा बाहेर बसावे लागणार आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिका देखील कोणताही बदल न करता हा सामना खेळेल.

रोहित-विराटला वर्ल्डकप जिंकायची संधी

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आतापर्यंत वनडे आणि टी-20 चे ६ विश्वचषक एकत्र खेळले आहेत. T20 विश्वचषक २०२४ हा या जोडीचा सातवा विश्वचषक आहे. 

२००७ मध्ये, जेव्हा भारताने पहिल्यांदा T20 विश्वचषक जिंकला तेव्हा रोहित संघाचा एक भाग होता. त्यावेळी विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नव्हते. २०११ मध्ये भारताने वनडे वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले तेव्हा रोहित भारतीय संघाबाहेर होता. अशा प्रकारे या जोडीला आतापर्यंत एकत्र विश्वचषक जिंकता आलेला नाही.

बार्बाडोसच्या मैदानावर आफ्रिकेचा रेकॉर्ड

बार्बाडोसच्या या मैदानावर दक्षिण आफ्रिकेने एकूण ३ सामने खेळले आहेत. या तीनपैकी दोन त्यांनी जिंकले आहेत. त्याचवेळी त्यांना एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.  २०१० च्या T20 विश्वचषकादरम्यान आफ्रिकन संघाने हे सर्व सामने खेळले होते. त्यादरम्यान अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला होता. त्याचवेळी आफ्रिकन संघाला इंग्लंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते.

बार्बाडोसच्या मैदानावर भारताचा रेकॉर्ड

भारताबाबत बोलायचे झाले तर भारतीय संघानेही येथे आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. यापैकी २ सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. तर, टीम इंडियाला एकात विजय मिळवण्यात यश आले आहे. 

२०१० च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला दोन्ही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्धचे सामने हरले होते. हे दोन्ही सामने सुपर-८ चे होते.

तर या म्हणजेच २०२४ च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताने बार्बाडोस येथे अफगाणिस्तानचा पराभव केला.

बार्बाडोसच्या मैदानावर या वर्ल्डकपचे ८ सामने झाले

आयसीसी पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे खेळवला जाणार आहे. चालू विश्वचषकात या मैदानावर ८ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी ३  सामने सुपर ८ चे होते. 

८ पैकी एक सामना निकालाविना राहिला. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने सर्वाधिक २०१ धावा केल्या होत्या. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने ७ पैकी ४ विजय मिळवले. 

WhatsApp channel