मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs SA Final : संपूर्ण क्रिकेट जगताच्या नजरा आज या ५ खेळाडूंवर असतील, एकहाती सामना फिरवतात

IND vs SA Final : संपूर्ण क्रिकेट जगताच्या नजरा आज या ५ खेळाडूंवर असतील, एकहाती सामना फिरवतात

Jun 29, 2024 04:07 PM IST

IND vs SA Final, World Cup 2024 : भारतीय संघाने उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करून टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आता आज (२९ जून) या स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया खूप मेहनत घेत आहे.

IND vs SA Final : संपूर्ण क्रिकेट जगताच्या नजरा आज या ५ खेळाडूंवर असतील, एकहाती सामना फिरवतात
IND vs SA Final : संपूर्ण क्रिकेट जगताच्या नजरा आज या ५ खेळाडूंवर असतील, एकहाती सामना फिरवतात

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज (२९ जून) विश्वचषक २०२४ चा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना रात्री ८ वाजता वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस येथील स्टेडियमवर होणार आहे.

उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा एकतर्फी पराभव केला होता. तर भारतीय संघानेही इंग्लंडचा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. २००७ आणि २०१४ नंतर भारतीय संघ तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणार आहे.

तर दक्षिण आफ्रिका प्रथमच कोणत्याही विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणार आहे. विश्वचषकात दोन्ही संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. मात्र संपूर्ण जगाच्या नजरा ५ खेळाडूंवर असतील. या खेळाडूंच्या बळावरच दोन्ही संघांपैकी एक संघ चॅम्पियन बनेल.

ट्रेंडिंग न्यूज

रोहित शर्मा

भारतीय कर्णधार रोहित शर्मा हा T20 विश्वचषकाच्या इतिहासातील असा दुसरा खेळाडू आहे. ज्याने आतापर्यंत झालेल्या सर्व T20 विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला आहे. गेल्या वर्षी १९ नोव्हेंबरला भारतीय संघ २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता. त्या पराभवाच्या जखमा रोहित शर्मा अजूनही विसरला नाही.

 रोहित शर्माने मागील दोन्ही सामन्यात अर्धशतक ठोकले. रोहित शर्माने या विश्वचषकाच्या ७ डावांमध्ये ४१.३३ च्या सरासरीने आणि १५५ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना २४८ धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. अंतिम सामन्यातही संपूर्ण जगाच्या नजरा रोहित शर्माच्या फलंदाजीवर असतील. रोहित शर्माने टीम इंडियाला चांगली सुरुवात दिली तर टीम इंडियाला जेतेपदाचे स्वप्न पूर्ण करण्यापासून रोखणे दक्षिण आफ्रिकेसाठी खूप कठीण जाईल.

जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराह सध्या जगातील नंबर वन गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराहने या विश्वचषकात चांगली कामगिरी केली आहे. कर्णधार रोहित शर्माला जेव्हा जेव्हा विकेट हवी असते, तेव्हा जसप्रीत बुमराह विकेट मिळवून देतो.

या T20 विश्वचषकातील सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत बुमराहचा समावेश आहे. त्याने ७ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने केवळ ४.५ च्या इकॉनॉमीसह १३ विकेट घेतल्या आहेत. टीम इंडियाला फायनल जिंकायची असेल तर जसप्रीत बुमराहला अचूक गोलंदाजी करावी लागेल.

कुलदीप यादव

या विश्वचषकात कुलदीप यादव भारतीय संघाचे ट्रम्प कार्ड असल्याचे सिद्ध झाले आहे. वेस्ट इंडिज लेगमध्ये विश्वचषकाची सुरुवात करणारा कुलदीप यादव अमेरिकेत एकही सामना खेळला नाही. पण असे असूनही त्याच्या गोलंदाजीचे आकडे आश्चर्यचकित करणारे आहेत. कुलदीप यादवने आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांमध्ये ५.८७ च्या इकॉनॉमीने धावा देत १० बळी घेतले आहेत.

उपांत्य फेरीच्या सामन्यातही त्याने अक्षर पटेलच्या साथीने इंग्लंड संघाचे कंबरडे मोडले. अंतिम सामन्यात सर्वांच्या नजरा कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर असतील.

क्विंटन डी कॉक

या विश्वचषकात क्विंटन डी कॉक दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. डेव्हिड मिलरनंतर क्विंटन डी कॉक हा दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज आहे. आतापर्यंत त्याने विश्वचषकातील ८ सामन्यांमध्ये १४३ च्या स्ट्राइक रेटने २०४ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन अर्धशतकांचाही समावेश आहे.

डी कॉककडेही आयपीएलचा भरपूर अनुभव आहे. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. डी कॉकची बॅट चालली तर भारतीय संघाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

एनरिक नॉर्खिया

या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेची ताकद ही त्यांची फलंदाजी नसून त्यांची गोलंदाजी आहे. विशेषतः दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाजी. त्यातील सर्वात मजबूत दुवा म्हणजे एनरिक नॉर्खिया. त्याने ८ सामन्यात ५.६४ च्या इकॉनॉमीसह १३ विकेट घेतल्या आहेत. एनरिक नॉर्खियाचा वेग प्रचंड आहे. आणि बार्बाडोसच्या खेळपट्टीवर एनरिक नॉर्खिया भारतीय फलंदाजांना खूप त्रास देऊ शकतो.

WhatsApp channel