Virat Kohli News: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची बॅट गेल्या काही सामन्यांपासून शांत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत चाहत्यांना कोहलीकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे. विराटला तिन्ही फॉरमॅटमध्ये धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. गेल्या आठ डावांमध्ये त्याला केवळ एक अर्धशतक करता आले. २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धही त्याने ही कामगिरी केली होती. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीला ९००० धावा पूर्ण करण्याची संधी असेल.
विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये ९ हजार धावा करणारा फलंदाज होण्याच्या अगदी जवळ आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विराट कोहलीला ९ हजार धावा पूर्ण करण्यासाठी ५३ धावांची गरज आहे. त्याने ५३ धावांचा टप्पा ओलांडल्यास तो कसोटीत नऊ हजारांपेक्षा जास्त धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरेल. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर यांनी ही कामगिरी केली आहे. कसोटीत ९ हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो १८ वा फलंदाज ठरणार आहे.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत ११५ सामने खेळले आहेत. ज्यात त्याने ८ हजार ९४७ धावा केल्या आहेत, ज्यात २९ शतके आणि ७ द्विशतकांचा समावेश आहे. याशिवाय ३० अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या २५४ आहे. तीन सामन्यांच्या घरगुती कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झाला असून त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दौरा आव्हानात्मक असेल. अशापरिस्थितीत विराटचा अनुभव आणि संघाप्रती त्याचे समर्पण महत्त्वाचे ठरणार आहे.
टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड क्रिकेट संघासोबत भारतीय संघ तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर १६ ते २० ऑक्टोबर दरम्यान पहिला कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. दुसरा कसोटी सामना २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तर तिसरी आणि शेवटची कसोटी १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. तिन्ही कसोटी सामन्यांना भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० वाजल्यापासून सुरुवात होईल.
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
राखीव खेळाडू: हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, मयंक यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.
संबंधित बातम्या