आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा १२ सामना आज (२ मार्च) भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे. उभय संघांमधील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल करण्यात आला आहे. हर्षित राणा याच्या जागी वरुण चक्रवर्ती संघात आला आहे. भारतीय संघ ४ फिरकी गोलंदाजांसह सामना खेळणार आहे. तर न्यूझीलंडनेही त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. डेव्हन कॉनवेच्या जागी डेरिल मिशेल याचा प्लेइंग-११ मध्ये समावेश करण्यात आला आहे.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी.
न्यूझीलंड: मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, डॅरिल मिशेल, मॅट हेन्री, टॉम लॅथम (विकेटकीपर), विल ओ'रूर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, विल यंग, काइल जेमिसन.
दरम्यान, दोन्ही संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. या सामन्यातील विजयी संघ उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. पराभूत संघाचा उपांत्य फेरीत सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. सामना जिंकणारा संघ आपल्या गटात अव्वल स्थानी पोहोचेल.
यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात फक्त एकच सामना खेळला गेला होता. यामध्ये किवी संघाने बाजी मारली होती. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण ११८ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत भारतीय संघाने ६० सामने जिंकले, तर ५० सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. ७ सामन्यांचा निकाल लागला नाही, तर एक सामनाही बरोबरीत सुटला.
एकूण एकदिवसीय: 118
भारत विजयी: ६०
न्यूझीलंड विजयी: ५०
अनिर्णित : ७
टाय: १
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली याच्यासाठी हा सामना खूप खास आहे. कोहलीच्या कारकिर्दीतील हा ३०० वा वनडे सामना आहे. भारताकडून ३०० एकदिवसीय सामने खेळणारा किंग कोहली हा केवळ सातवा क्रिकेटर आहे. मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि युवराज सिंग यांचाही या स्पेशल क्लबमध्ये समावेश आहे.
संबंधित बातम्या