ind vs nz super six live streaming : अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये सुपर सिक्सचा थरार सुरू झाला आहे. आज (३० जानेवारी) सुपर-६ मध्ये भारत आणि न्यूझीलंड आमने सामने येणार आहेत. भारताने अ गटातून सलग तीन सामने जिंकून सुपर-६ मध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे टीम इंडियाचे मनोबल उंचावलेले असेल.
भारताने अंडर-१९ वर्ल्डकपच्या ग्रुप फेरीत बांगलादेश, आयर्लंड आणि अमेरिकेचा पराभव केला. बांगलादेशविरुद्धचा पहिला सामना भारताला थोडासा जड गेला पण त्यानंतरच्या दोन सामन्यांमध्ये भारताने शानदार विजय नोंदवले.
भारतासाठी प्रत्येक सामन्यानत एक-दोन फलंदाजांनी जबाबदारी स्वीकारून धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मुशीर खानने सातत्याने चांगली फलंदाजी केली आहे. सरफराज खानचा धाकटा भाऊ मुशीर एक शतक आणि एक अर्धशतकांसह सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
तर सलामीवीर आदर्श सिंग चांगली सुरुवात करत आहे, पण त्याचे रुपांतर मोठ्या डावात करण्यात त्याला अपयश येत आहे. कर्णधार उदय सहारननेही चांगली फलंदाजी केली आहे. गोलंदाजीत डावखुरा वेगवान गोलंदाज नमन तिवारीने चांगली कामगिरी केली आहे. गेल्या दोन सामन्यांत त्याने ४ विकेट घेतल्या. डावखुरा फिरकीपटू सोमी पांडेने आतापर्यंत ८ विकेट्स घेतल्या आहेत.
न्यूझीलंडने ड गटातून तीन सामन्यांत दोन विजय मिळवून सुपर ६ मध्ये प्रवेश केला. पण त्यांचे फलंदाज संघर्ष करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांना गोलंदाजी आणि फलंदाजीत चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुपर-६ चा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह दिसणार आहे. तर हॉटस्टारवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येणार आहे.
भारत: अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेल्ली अवनीश राव, सौम्य कुमार पांडे, मुरुगन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिंबानी आणि नमन तिवारी.
न्यूझीलंड: ऑस्कर जॅक्सन (कर्णधार), मेसन क्लार्क, सॅम क्लोड, जॅक कमिंग, रहमान हिकमत, टॉम जोन्स, जेम्स नेल्सन, स्नेहित रेड्डी, मॅट रो, इवाल्ड श्र्युडर, लचलान स्टॅकपोल, ऑलिव्हर टेवाटिया, ॲलेक्स थॉम्पसन, रायन सॉर्गस, ल्यूक वॉटसन.