भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. ज्यामध्ये भारताने दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन केले. भारतीय संघ पहिल्या डावात ४६ धावांत सर्वबाद झाला होता. पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्मा १२ चेंडूत २ धावा करून बाद झाला. मात्र दुसऱ्या डावात त्याने अर्धशतक झळकावले.
या दरम्यान, रोहितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो पव्हेलियनमध्ये जाण्याचा मार्ग विसरल्याचे दिसत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा स्टँडच्या मागून तंबूत जाण्याचा मार्ग शोधताना दिसत आहे. रोहित चालताना काहीतरी विचार करत होता. या नादात तंबूत जाण्याचा रस्ता विसरला.
यावेळी त्याच्या पाठोपाठ यष्टीरक्षक ध्रुव जुरेलही चालताना दिसत आहे. पण काही पावलं चाल्यानंतर आपण रस्ता चुकल्याचे त्याच्या लक्षात आले आणि तो योग्य मार्गाने गेला. या मजेशीर प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पहिल्या डावात अवघ्या २ धावांवर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात रोहित शर्माने शानदार खेळी केली. त्याने ६३ चेंडूत ८२.५४ च्या स्ट्राईक रेटने ५२ धावा केल्या. यामध्ये ८ चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता. या डावात रोहित शर्माच्या नशिबाने त्याला साथ दिली नाही आणि चेंडू बॅटला आदळल्यानंतर विकेटवर आदळला, यामुळे त्याला तंबूत जावे लागले.
पहिल्या डावात संपूर्ण फलंदाजी फ्लॉप ठरल्यानंत टीम इंडियाने दुसऱ्या डावाता दमदार फलंदाजी केली. चौथ्या नंबरवर फलंदाजीस आलेल्या सरफराज खानने आपल्या कसोटी करिअरचे पहिले शतक झळकावले. त्याने ११० चेंडूत शतक पूर्ण केले. तो १९५ चेंडूत १५० धावा करून बाद झाला. तर ऋषभ पंतचे शतक एका धावेने हुकले. तो ९९ धावांवर बाद झाला.