न्यूझीलंडने भारताविरुद्धची पहिली कसोटी ८ गडी राखून जिंकली. या सामन्यासाठी रचिन रवींद्र याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. रचिनने न्यूझीलंडच्या पहिल्या डावात शतक झळकावले. त्याने १३४ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात ३९ नाबाद धावा केल्या. भारताच्या पराभवामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे फलंदाजी. पहिल्या डावात टीम इंडिया ४६ धावांवर गारद झाली होती. यासोबतच नाणेफेकही महत्त्वाची ठरली.
विशेष म्हणजे, न्यूझीलंडने ३६ वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकला आहे. यापूर्वी, न्यूझीलंडने जॉन राईटच्या नेतृत्वाखाली १९८८ मध्ये वानखेडे स्टेडियमवर भारताचा १३६ धावांनी पराभव केला होता. आता ३६ वर्षांनंतर किवींनी भारतात येऊन भारताचा पराभव केला आहे.
पहिल्या डावात ४६ धावांत बाद होऊनही भारताने ज्या प्रकारे सामन्यात पुनरागमन केले ते कौतुकास्पद होते. आता टीम इंडियाला हा पराभव विसरून २४ ऑक्टोबरपासून पुण्यात सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आपला नैसर्गिक खेळ दाखवावा लागणार आहे.
त्याआधी आपण या सामन्यात भारताच्या पराभवाची ४ मोठी कारणे पाहूया.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ अवघ्या ४६ धावांत सर्वबाद झाला. ५ फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. या लाजिरवाण्या धावसंख्येने भारताच्या पराभवात सर्वात मोठी भूमिका बजावली.
भारताला अवघ्या ४६ धावांत गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात ४०२ धावांपर्यंत मोठी मजल मारली. एकवेळ न्यूझीलंडने २३३ धावांत ७ विकेट गमावल्या होत्या. पण त्यानंतर रचिन रवींद्र (१३४) आणि टीम साउथी (६५) यांच्यात आठव्या विकेटसाठी विक्रमी शतकी भागीदारी झाली.
भारतीय गोलंदाजांनी ही जोडी लवकर बाद केली असती तर न्यूझीलंडला ३५६ धावांची आघाडी घेता आली नसती. भारताच्या पराभवाचे हे सर्वात मोठे कारण आहे.
३५६ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर, भारत हा सामना एका डावाने गमावेल असे वाटत होते, परंतु सरफराज खानने कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी (१५०) केली, त्याला ऋषभ पंत (९९) यांचीही चांगली साथ लाभली. जोपर्यंत दोघे क्रीजवर होते तोपर्यंत भारताचे स्कोअरकार्ड वेगाने वाढत होते. पण दोन्ही विकेट एकामागोमाग पडल्या, त्यानंतर भारताने ५७ धावांतच पुढील ७ विकेट गमावल्या.
केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी चांगली फलंदाजी केली असती तर कदाचित ते न्यूझीलंडला मोठे लक्ष्य देऊ शकले असते.
शेवटच्या दिवशी ओल्या मैदानामुळे सामना एक तास उशिराने सुरू झाला. नवीन चेंडू हाताळताना बुमराहने २९ धावांत २ बळी घेतले. टॉम लॅथम पहिल्याच षटकात शुन्यावर बाद झाला. अंपायरने त्याला एलबीडब्ल्यू दिला आणि त्याने रिव्ह्यू घेतला.
पण डीआरएसमध्येही तो बाद झाल्याचे स्पष्ट झाले. बुमराह आणि सिराज यांना पीचकडून मदत मिळत होती. अशा स्थितीत भारताला तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची कमतरता भासली.
भारताने तिसरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला मैदानात उतरवले होते, ज्याने तीन षटकांत २६ धावा दिल्या. त्यावेळी न्यूझीलंडची धावसंख्या दोन बाद ३५ धावा होती, पण त्यानंतर विल यंग आणि रचिनने सहज खेळ केला. तिसरा वेगवान गोलंदाज असता तर परिस्थिती वेगळी असती.