आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडने भारताला विजयासाठी २५२ धावांचे लक्ष्य दिले आहे. न्यूझीलंडकडून मायकेल ब्रेसवेल (नाबाद ५३) आणि डॅरिल मिचेल (६३) यांनी अर्धशतके झळकावली.
हा सामना दुबईच्या त्याच खेळपट्टीवर खेळला जात आहे, ज्या पीचवर भारत-पाकिस्तान सामना झालाहोता. न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा डॅरिल मिशेलने केल्या, ज्याने ६३ धावांची संथ पण अत्यंत महत्त्वाची खेळी खेळली.
आता तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता बनण्यासाठी भारतीय संघाला २५२ धावा कराव्या लागतील. टीम इंडियाकडून कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर रचिन रवींद्र आणि विल यंग यांनी किवींना शानदार सुरुवात करून दिली. रचिन रवींद्र आणि विल यंग यांनी मिळून ७.५ षटकांत ५७ धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान रवींद्रला प्रथम मोहम्मद शमी आणि नंतर श्रेयस अय्यरने झेलबाद केले. विल यंगला (१५) LBW बाद करणाऱ्या वरुण चक्रवर्तीने अखेर भारताला पहिले यश मिळवून दिले.
त्यानंतर कुलदीप यादवने रचिन रवींद्रला गोलंदाजी करत भारताला दुसरे यश मिळवून दिले. रवींद्रने २९ चेंडूंत ४ चौकार आणि १ षटकारासह ३७ धावा केल्या. यानंतर कुलदीपने अनुभवी फलंदाज केन विल्यमसनलाही बाद करत स्वताच्याच गोलंदाजीवर त्याचा झेल घेतला.
केन विल्यमसन (११) बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या ३ बाद ७५ धावा होती. यानंतर डॅरिल मिशेल आणि टॉम लॅथम यांनी किवींचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजाने लॅथमला (१४) LBW बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली.
चौथी विकेट १०८ धावांवर पडल्यानंतर मिशेलने ग्लेन फिलिप्ससोबत पाचव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली.
ग्लेन फिलिप्सला फिरकीपटू वरुण चक्रवर्तीची गुगली वाचता आली नाही आणि तो बोल्ड झाला. फिलिप्सने ५२ चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३४ धावा केल्या.
फिलिप्स बाद झाल्यानंतर काही वेळातच डॅरिल मिशेलने ९१ चेंडूत अर्धशतक केले. मिशेल ६३ धावा करून बाद झाला. मिचेलने १०१ चेंडूंच्या खेळीत ३ चौकार मारले. मिचेलला मोहम्मद शमीने कर्णधार रोहित शर्माकरवी झेलबाद केले.
येथून मायकेल ब्रेसवेलने तुफानी खेळी करत न्यूझीलंडला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. ब्रेसवेलने ४० चेंडूंत नाबाद ५३ धावा केल्या, ज्यात कर्णधार मिचेल सँटनरसह २८ धावा जोडल्या. सँटनर ८ धावा करून धावबाद झाला. भारतातर्फे वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तर मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली.
संबंधित बातम्या