न्यूझीलंडने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताचा ३-० असा धुव्वा उडवला. यानंतर टीम इंडियावर प्रचंड टीका होता आहे. चाहत्यांसह माजी क्रिकेटपटू आणि समीक्षकही भारतीय संघावर तुटून पडले आहेत.
तर न्यूझीलंडचा हा ऐतिहासिक विजय ठरला. या पराभवावर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर यानेही प्रतिक्रिया दिली आहे. सचिनने भारताच्या पराभवाचे कारण सांगितले. त्याने शुभमन गिल आणि ऋषभ पंतचे कौतुक केले आहे. तर कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची तयारी अपूर्ण होती, असे कारण सचिन सांगितले आहे.
वास्तविक, सचिनने भारताच्या पराभवाबाबत X वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले की, 'मायदेशात ३-० असा पराभव पचवणे सोपे नाही. तयारीचा अभाव होता का? शॉट्सची निवड चुकीची होती की सामन्याची तयारी पूर्ण झाली नव्हती, असे सचिनने लिहिले आहे. शुभमन गिलने पहिल्या डावात चांगली कामगिरी केली आणि ऋषभ पंतने दोन्ही डावात उत्कृष्ट खेळ केला. आव्हानात्मक खेळपट्टीवर त्याचे फूटवर्क उत्कृष्ट होते.
टीम इंडियाच्या मालिका पराभवामुळे सचिन खूश नाही. त्याने न्यूझीलंडच्या खेळाडूंचेही कौतुक केले. भारताविरुद्धच्या अशा विजयाचे संपूर्ण श्रेय सचिनने न्यूझीलंडला दिले आहे.
न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत भारताचा ८ विकेटने पराभव केला होता. दुसऱ्या कसोटीत त्यांनी ११३ धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडने तिसरी कसोटी २५ धावांनी जिंकली.
भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ऋषभ पंत अव्वल स्थानावर आहे. पंतने ३ सामन्यात २६१ धावा केल्या. त्याने ३० चौकार आणि ८ षटकार मारले. या मालिकेत भारताकडून यशस्वी जैस्वालने १९० धावा केल्या. एकूण यादीत तो पाचव्या स्थानावर आहे. यशस्वीने २४ चौकार आणि ३ षटकार मारले.