भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना १६ ऑक्टोबरपासून खेळवला जात आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. पावसामुळे पहिला दिवस नाणेफेकीविना रद्द झाला.
यानंतर आज (१७ ऑक्टोबर) दुसऱ्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय भारताच्या अंगलट आला असून संघाचे टॉप तीन फलंदाज अवघ्या १० धावांवर तंबूत परतले. विराट कोहली शून्यावर बाद झाला.
दरम्यान, या सामन्यासाठी विराट मैदानात येताच त्याने एमएस धोनीचा एक विक्रम मोडला आहे.
रोहित शर्मा ६ व्या षटकात १६ चेंडूत २ धावा करून बाद झाला. यापूर्वी विराट कोहली पाचव्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा, पण न्यूझीलंडविरुद्ध विराट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. विराट कोहली ९ चेंडू खेळून ९व्या षटकात शून्यावर बाद झाला.
विराट कोहलीने आतापर्यंत ११६ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये कोहली १५ वेळा शून्यावर आऊट झाला आहे. विराट कोहलीने ५३ धावा केल्या असत्या तर तो ९ हजार धावांच्या क्लबमध्ये सामील झाला असता. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ८९४७ धावा केल्या आहेत.
नाणेफेक दरम्यान, रोहित शर्माने भारतीय संघाच्या अकरा खेळाडूंची यादी जाहीर करताच विराट कोहलीने एमएस धोनीचा मोठा विक्रम मोडला. कारण या प्लेइंग इलेव्हनमध्ये विराट कोहलीचेही नाव होते.
या सामन्यापूर्वी, एमएस धोनी भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर होता. मात्र आता विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आला असून एमएस धोनी तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.
सचिन ६६४ आंतरराष्ट्रीय सामने खेळून सचिन पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने आतापर्यंत ५३६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर एमएस धोनीने भारतासाठी ५३५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.