टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी सांगितले की, त्यांना कोणत्या प्रकारचा संघ तयार करायचा आहे. तत्पूर्वी, अलीकडेच भारतीय संघाने बांगलादेशला कसोटी मालिकेत क्लीन स्वीप केले होते.
आता टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला १६ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. गौतम गंभीरने सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
गंभीर म्हणाले की, त्यांना संघात दोन दिवस टिकून फलंदाजी करणारे खेळाडूही संघात हवे आहेत आणि टी-20 स्टाईलमध्ये झटपट खेळणारे खेळाडूही संघात हवे आहेत.
भारतीय संघाचा मला अभिमान असल्याचे गंभीर म्हणाले. या संघाच्या संपूर्ण फळीत अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. बांगलादेशविरुद्धच्या कानपूर कसोटीत भारतीय संघाने टी-20 शैलीत फलंदाजी केली होती. पावसामुळे सामन्याचे दोन दिवस वाया गेले होते, अशा स्थितीत टीम इंडियाने सामन्याचा निकाल लावणयासाठी झटपट फलंदाजी केली होती.
गंभीर पुढे म्हणाला, “आम्हाला असा संघ बनवायचा आहे जो एका दिवसात ४०० धावा करू शकतो आणि कसोटी सामना वाचवण्यासाठी दोन दिवस फलंदाजीही करू शकतो. ही प्रोग्रेस आम्ही शोधत आहोत. हे खरेच कसोटी क्रिकेट आहे. आमच्याकडे ड्रेसिंग रूममध्ये असे फलंदाज आहेत जे दोन्ही करू शकतात. पहिले उद्दिष्ट नेहमीच जिंकणे असते आणि जर अशी परिस्थिती उद्भवली की आम्हाला ड्रॉसाठी खेळावे लागेल, तर तो आमचा दुसरा आणि तिसरा पर्याय आहे."
गंभीर म्हणाला, "ज्या खेळाडूंना त्यांचा नैसर्गिक खेळ खेळायचा आहे त्यांना आम्ही अडवणार नाही. एका दिवसात ४००-५०० धावा करू शकणाऱ्या खेळाडूंना रोखण्याची गरजच काय?. टी-20 क्रिकेटमध्ये मी नेहमीच म्हटले आहे की, आम्ही हाय रिस्क खेळ खेळणार, हाय रिस्क रिवॉर्ड मिळणार.
अशा स्थितीत असेही दिवस येतील, जेव्हा आम्ही १०० धावांवर सर्वबाद होऊ, परंतु आम्हाला हा खेळ खेळायचा आहे, त्याच प्रकारे आम्ही मनोरंजन करू इच्छितो."
संबंधित बातम्या