India beats Japan in U19 Asia Cup : कर्णधार मोहम्मद अमन (नाबाद १२२) याचं धडाकेबाज शतक आणि आयुष म्हात्रे (५४) आणि केपी कार्तिकेय (५७) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतानं १९ वर्षांखालील आशिया चषक २०२४ च्या आठव्या सामन्यात जपानवर २११ धावांनी मात केली. या विजयामुळं भारताचे खात्यात दोन गुण जमा झाले असून संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.
भारताच्या ३४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जपानच्या संघाची सुरुवात संथ झाली. ह्युगो केली आणि निहार परमार या सलामीच्या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. १४व्या षटकात हार्दिक राजनं निहार परमारला (१४) बाद करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर कर्णधार कोजी आबे (०) याला केपी कार्तिकेयनं बाद करत भारतासाठी दुसरी विकेट घेतली.
काटो-स्टॅफर्डवर (८) काझुमा रन आऊट झाला. ३३व्या षटकात हार्दिक राजनं ह्युगो केलीला बाद करत भारताला मोठं यश मिळवून दिलं. केलीनं ६ चौकार लावत १११ चेंडूत (५०) केल्या. यानंतर चार्ल्स हिंजे वगळता जपानचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजी आक्रमणापुढे फार काळ टिकू शकला नाही.
चार्ल्स हिंजनं ६८ चेंडूत (नाबाद ३५) धावा केल्या. तियामुती मूर (१), आदित्य फडके (९) आणि केवाय लेक (१) धावांवर बाद झाले. जपानचा संघ निर्धारित ५० षटकांत ८ बाद १२८ धावा च करू शकला आणि २११ धावांनी सामना गमावला. भारताकडून चेतन शर्मा, हार्दिक राज आणि केपी कार्तिकेय यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. युधजीत गुहानं एक विकेट घेतली. तत्पूर्वी, जपाननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी या भारताच्या सलामी जोडीनं चांगली सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. आठव्या षटकात चार्ल्स हिंगेनं वैभव सूर्यवंशीला (२३) बाद करून जपानला पहिलं यश मिळवून दिलं.
यानंतर अकराव्या षटकात आर तिवारीनं आयुष म्हात्रे (५०) याला बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. आंद्रे सिद्धार्थ (३७), निखिल कुमार (१२), हरवांश पांगलिया (१) धावांवर बाद झाले. केपी कार्तिकेयनं ४९ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं ५७ धावा केल्या. कर्णधार मोहम्मद अमाननं ११८ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद १२२ धावा केल्या. हार्दिक राजनं १२ चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद २५ धावांची खेळी केली. या जोरावर भारतीय संघानं ५० षटकांत ६ बाद ३३९ धावांची मोठी धावसंख्या उभारली. जपानकडून केवाय लेक आणि ह्युगो केली यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. चार्ल्स हिंजे आणि आर तिवारी यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केलं.
संबंधित बातम्या