ind vs ire highlights t20 world cup 2024 : टी-20 विश्वचषक २०२४ चा आठवा सामना आज (५ जून) भारत आणि आयर्लंड यांच्यात खेळला गेला. अ गटातील या सामन्यात भारताने आयर्लंडचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवला. यानंतर आता भारतीय संघ आता पुढील सामन्यात ९ जून रोजी पाकिस्तानला भिडणार आहे.
न्यू यॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय गोलंदाजांनी आयर्लंडला अवघ्या ९७ धावांत गारद केले. आयर्लंडचे फलंदाज केवळ १६ षटके क्रीजवर टिकू शकले.
प्रत्युत्तरात भारताने १२.२ षटकात २ गडी गमावून ९७ धावा करत सामना जिंकला.
भारतीय संघासाठी कर्णधार रोहित शर्माने ३७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५२ धावा केल्या. या दरम्यान रोहितने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये ४ हजार धावाही पूर्ण केल्या.
तसेच, त्याने बाबर आझमला मागे टाकले आणि आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानावर आला आहे. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत २६ चेंडूत ३६ धावा करून नाबाद राहिला. पंतने आपल्या खेळीत ३ चौकार आणि २ षटकार मारले.
याआधी विराट कोहली १ तर सूर्यकुमार यादव २ धावा करून बाद झाले.
टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी आलेल्या आयर्लंडची सुरुवात इतकी खराब झाली की पहिल्या ३ षटकांतच संघाने सुरुवातीच्या दोन्ही फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या. कर्णधार पॉल स्टर्लिंग २ धावा करून बाद झाला आणि अँड्र्यू बार्लबर्नीलाही केवळ ५ धावा करता आल्या. अर्शदीप सिंगने या दोन्ही फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर आयर्लंडचा शेवटपर्यंत संघ सावरू शकला नाही.
आयरिश संघाकडून गॅरेथ डेलेनीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने १४ चेंडूत २६ धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.
आयरिश संघाचे केवळ ४ फलंदाज दुहेरी आकडा ओलांडू शकले आणि उर्वरित ७ फलंदाजांनी १० धावांचा आकडाही ओलांडला नाही. आयर्लंडकडून सर्वाधिक धावा गॅरेथ डेलेनीने केल्या, त्याने १४ चेंडूत २६ धावा केल्या.
भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच षटकापासूनच धुमाकूळ घातला. हार्दिक पंड्याने सर्वाधिक विकेट घेतल्या. हार्दिकने एकूण ३ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी २ बळी घेत आयर्लंडला मोठी धावसंख्या बनवण्यापासून वंचित ठेवले.
संबंधित बातम्या