भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये सुरू आहे. आज (१७ फेब्रुवारी) सामन्याचा तिसरा दिवस आहे. भारताने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव ३१९ धावांवर आटोपला. आता पहिल्या डावाच्या जोरावर भारताला १२६ धावांची मोठी आघाडी मिळाली आहे.
तत्पूर्वी, आज इंग्लंडने २ बाद २०७ धावांवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि ११२ धावांची भर घालून उर्वरित ८ विकेट गमावल्या. तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. भारताने पहिल्या सत्रात दोन गडी बाद केले. तिसऱ्या दिवशी बाद होणारा पहिला फलंदाज जो रूट (१०) होता. रुटला जसप्रीत बुमराहने झेलबाद केले. यानंतर पुढच्याच षटकात जॉनी बेअरस्टो शुन्यावर बाद झाला. कुलदीप यादवने जॉनी बेअरस्टोला आपल्या फिरकीत अडकवून एलबीडब्ल्यू आऊट केले.
यानंतर इंग्लंडच्या ठाराविक अंतराने विकेट पडत राहिल्या. त्यांच्याकडून बेन डकेटने सर्वाधिक १५३ धावांची खेळी केली. डकेटला कुलदीपने यादवने झेलबाद केले. डकेटने १५१ चेंडूत २३ चौकार आणि २ षटकार मारले.
यानंतर लंचपर्यंत बेन स्टोक्स आणि बेन फोक्स नाबाद होते. लंचनंतर इंग्लिश संघाला लागोपाठ दोन चेंडूत दोन धक्के बसले. इंग्लंडच्या डावाच्या ६५ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रवींद्र जडेजाने बेन स्टोक्सला जसप्रीत बुमराहकरवी झेलबाद केले. त्याला ४१ धावा करता आल्या.
पुढच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर म्हणजेच ६६व्या षटकात मोहम्मद सिराजने बेन फॉक्सला रोहितकरवी झेलबाद केले. फॉक्स १३ धावा करून बाद झाला. यानंतर ३१४ धावांवर इंग्लंडला आणखी दोन धक्के बसले.
सिराजने रेहान अहमदला क्लीन बोल्ड केले. त्याला ६ धावा करता आल्या. पुढच्याच षटकात जडेजाने टॉम हार्टलीला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकरवी यष्टिचित केले. यानंतर सिराजने जेम्स अँडरसनला (१) क्लीन बोल्ड करून इंग्लंडचा डाव ३१९ धावांवर संपवला.
भारताकडून सिराजने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर कुलदीप आणि जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. बुमराह-अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.