भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कटक येथे खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने ३०४ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने ६ गडी गमावून हे लक्ष्य सहज पार केले.
एवढेच नाही तर टीम इंडियाने आता ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने हा सामना नक्कीच जिंकला, पण असे असतानाही संघातील एका खेळाडूने कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांना अडचणीत आणले आहे. या खेळाडूबाबत टीम मॅनेजमेंट लवकरच मोठा निर्णय घेऊ शकते.
टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल बऱ्याच काळापासून चांगली खेळी खेळण्यात अपयशी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी फॉर्मेटमध्ये फ्लॉप झाल्यानंतर राहुल आता एकदिवसीय सामन्यातही धावा करत नाहीये. या मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये राहुलला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते.
साधारणपणे पाचव्या क्रमांकावर खेळणाऱ्या राहुलऐवजी संघ व्यवस्थापन सध्या अक्षर पटेलला पाचव्या क्रमांकावर खेळवत आहे. पटेलने दोन्ही सामन्यात धावा केल्या आहेत, पण केएल राहुलने सलग दोन्ही सामन्यात निराशा केली आहे.
नागपुरात खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुलला ९ चेंडूत केवळ २ धावा करता आल्या. असेच दुसऱ्या वनडेतही घडले. कटक वनडेत केएल राहुलने केवळ १० धावा केल्या आणि १४ चेंडू खेळले. अशा परिस्थितीत आता प्लेइंग ११ मध्ये त्याचे स्थान धोक्यात आले आहे.
संघ व्यवस्थापन यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करू शकते. पंतला मॅच विनर समजले जाते आणि यासोबतच तो संघाला डाव्या हाताचा पर्यायही देतो. गेल्या दोन सामन्यांपासून डगआऊटमध्ये बसलेला पंत आता राहुलची जागा घेऊ शकतो.
केएल राहुलच्या फलंदाजीचे स्थान सतत बदलत राहिल्याने त्याच्या फलंदाजीवर परिणाम झाल्याचे काही क्रिकेट एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे. मॅनेजमेंट राहुलला प्रत्येक फॉरमॅटमध्ये वेगळ्या नंबरवर आजमावत आहे. कधी सलामीवीर, कधी चौथा तर कधी पाचव्या क्रमांकावर राहुल फलंदाजी करत आहे.
२०२३ च्या विश्वचषकापर्यंत राहुल टीम इंडियाचा पाचव्या क्रमांकाचा फलंदाज बनला होता आणि त्याने खूप धावाही केल्या. मात्र त्यानंतर त्याच्या फलंदाजी क्रमवारीत सातत्याने बदल होत असून त्याचा परिणाम त्याच्या फॉर्मवर झाला आहे.
संबंधित बातम्या