Ind vs Eng Test : जडेजा-केएल राहुलने दुसरा दिवस गाजवला, हैदराबाद कसोटीवर टीम इंडियाची मजबूत पकड-ind vs eng hyderabad test day 2 highlights kl rahul ravindra jadeja scored half century ks bharat ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind vs Eng Test : जडेजा-केएल राहुलने दुसरा दिवस गाजवला, हैदराबाद कसोटीवर टीम इंडियाची मजबूत पकड

Ind vs Eng Test : जडेजा-केएल राहुलने दुसरा दिवस गाजवला, हैदराबाद कसोटीवर टीम इंडियाची मजबूत पकड

Jan 26, 2024 05:24 PM IST

Ind vs Eng Hyderbad Test Day 2 : हैदराबाद कसोटीत भारताने दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद ४२१ धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजा ८१ धावांवर तर अक्षर पटेल ३५ धावांवर नाबाद परतले आहेत.

Ind vs Eng Hyderbad Test Day 2
Ind vs Eng Hyderbad Test Day 2 (REUTERS)

India vs England Hyderbad Test match Day 2 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हैदराबाद येथे खेळवला जात आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २४६ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने आज (२६ जानेवारी) दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद ४२१ धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजा ८१ धावांवर तर अक्षर पटेल ३५ धावांवर नाबाद परतले आहेत.

५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यावर भारताने आता मजबूत पकड निर्माण केली आहे.

कालचे नाबाद फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी आज २ बाद ११९ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. आज पहिल्याच षटकात बाद झाला. त्याने ८० धावा केल्या. यानंतर केएल राहुल आणि शुभमन गिलने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र अवघ्या २३ धावा करून गिल टॉम हार्टलीचा बळी ठरला. त्यानंतर श्रेयस आणि राहुलने ६४ धावांची भागीदारी केली.

श्रेयस मोठी धावसंख्या करेल असे वाटत होते, पण मोठा फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला, त्याने ३५ धावा केल्या. श्रेयसनंतर राहुलला रविंद्र जडेजाची साथ मिळाली, दोघांनी ६५ धावा जोडल्या. 

पण राहुल त्याचे शतक पूर्ण करू शकला नाही. राहुलने १५२ चेंडूत ८० धावा केल्या, यात त्याने ७ चौकार आणि २ षटकार मारले. यानंतर रविंद्र जडेजा आणि केएस भरत यांनी चांगली फलंदाजी केली. भरत ४१ धावा करून बाद झाला.

रविंद्र जडेजा १५५ चेंडूंत ८१ धावांवर नाबाद आहे, त्याने आतार्यंत ७ चौकार आणि दोन षटकार मारले आहेत. तर अक्षरने ६२ चेंडूंच्या खेळीत ५ चौकार आणि एक षटकार ठोकला.

या सामन्यात इंग्लंडने पहिल्या दिवशी सर्वबाद २४६ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक ७० धावा केल्या. तर भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले, या दोघांनी प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या. तर अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांना प्रत्येकी दोन विकेट मिळाले.