भारतीय क्रिकेट संघाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा ४ गडी राखून पराभव केला. यासह टीम इंडिया मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १० गडी गमावून केवळ २४८ धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात टीम इंडियानेही ३९ व्या षटकात काही विकेट्स गमावून सामना जिंकला. मात्र, या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पुन्हा निराशा केली.
ऑस्ट्रेलियातील खराब दौऱ्यानंतर रोहित शर्मा वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमच्या पीचवर रोहितला चांगली खेळी करण्याची सुवर्णसंधी होती. मात्र ७ चेंडूत केवळ २ धावा करून रोहित बाद झाला. त्याला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज साकिब महमूदने बाद केले.
मात्र, शुभमन गिल, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर यांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने विजय मिळवला.
यादरम्यान, या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
पहिला एकदिवसीय सामना संपल्यानंतर, कॅमेरा काही सेकंदांसाठी भारतीय डगआउटकडे वळला, जिथे कर्णधार रोहित शर्मा प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी दीर्घ संभाषण करत होता.
दोघांचे हावभाव पाहून काहीतरी गंभीर चर्चा असल्याचे वाटत होते. संघाच्या भवितव्याबाबत ही महत्त्वाची चर्चा असू शकते. अलीकडच्या काळात या दोन्ही दिग्गजांमध्ये वाद झाल्याच्या बातम्याही येत होत्या, मात्र या व्हिडिओमध्ये दोघेही केवळ संघाबद्दलच चर्चा करत होते.
ऑस्ट्रेलियातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. रोहित बॉर्डर गावस्कर या मालिकेत धावा करण्यात पूर्णपणे अपयशी ठरला. त्यामुळे तो सिडनी कसोटीत खेळला नव्हता.
संबंधित बातम्या