IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये खेळवला जात आहे. आज (२४ फेब्रुवारी) सामन्याचा दुसरा दिवस आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव ३५३ धावांवर आटोपला. इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक नाबाद १२२ धावा केल्या.
जो रूट आणि ऑली रॉबिन्सन यांनी आठव्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी करून इंग्लंडला चांगल्या स्थितीत पोहोचवले. खास बाब म्हणजे पहिल्या दिवशी झटपट ५ विकेट्स गमावल्यानंतर इंग्लिश संघाने बॅझबॉल शैली सोडून पारंपरिक शैलीत कसोटी क्रिकेट खेळले.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, इंग्लंडने पहिल्या दिवसाच्या ७ बाद ३०२ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. रूट आणि रॉबिन्सनने पहिल्या सत्रात झटपट ४५ धावा जोडल्या. अशातच दोघांची शतकी भागीदारी पूर्ण झाली. यानंतर रॉबिन्सन ५८ धावा करून रवींद्र जडेजाच्या चेंडूवर बाद झाला. त्याच षटकात शोएब बशीर शुन्यावर बाद झाला. यानंतर जडेजाने आपल्या पुढच्याच षटकात जेम्स अँडरसनला (२) बाद करून इंग्लंड संघाला ३५३ धावांवर रोखले.
तत्पूर्वी, या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि संघाला वेगवान सुरुवात करून दिली. झॅक क्राउली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी ५६ चेंडूत ४७ धावांची भागीदारी केली. पण डकेट बाद झाला आणि त्यानंतर दोन विकेट लवकर गेल्या. पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या आकाश दीपने ऑली पोप (००) आणि जॅक क्रॉली (४२) यांना बाद केले. अशाप्रकारे इंग्लिश संघाने ५७ धावांत ३ विकेट गमावल्या होत्या.
यानंतरही इंग्लिश संघाने बॅझबॉल स्टाईलमध्ये फलंदाजी सुरूच ठेवली. जॉनी बेअरस्टोने ३५ चेंडूत स्फोटक पद्धतीने ३८ धावा केल्या. मात्र, अश्विनच्या एका चेंडूवर स्वीप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात बेअरस्टोला आपली विकेट गमवावी लागली. यानंतर लगेचच बेन स्टोक्सही बाद झाला.पहिल्या सत्रात इंग्लंडच्या संघाने २४.१ षटकात ११२ धावा करून ५ विकेट गमावल्या होत्या. यानंतर दुसरे सत्र सुरू झाले तेव्हा इंग्लिश फलंदाजांचा खेळ बदलताना दिसला.
यानंतर जो रूट आणि विकेटकीपर फलंदाज बेन फोक्स यांनी सावध फलंदाजी करत डाव पुढे प्रयत्न केला. या दोघांनी २६१ चेंडूत ११३ धावांची भागीदारी करत इंग्लंडला सन्मानजनक स्थितीत नेले. पण येथे बेन फॉक्स ४७ धावा करून सिराजचा बळी ठरला.
यानंतर रूट आणि टॉम हार्टले यांच्यात केवळ २० धावांची भागीदारी झाली. २४५ धावांत ७ विकेट गमावलेल्या इंग्लंडला मग ऑली रॉबिन्सनची साथ लाभली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत रॉबिन्सन जो रूटसोबत खेळपट्टीवर टिकून होता. त्याने रुटसोबत ५७ धावांची भागीदारी केली होती. आज दुसऱ्या दिवशी त्याने रूटसोबत शतकी भागीदारी पूर्ण करत इंग्लंडला मजबूत स्थितीत पोहोचवले. भारताकडून रवींद्र जडेजाने ४, आकाश दीपने ३, सिराजने २ आणि अश्विनने एक विकेट घेतली.