IND vs ENG : गौतम गंभीरच्या टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी, १३ वर्षानंतर इंग्लंडला क्लिन स्वीप
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG : गौतम गंभीरच्या टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी, १३ वर्षानंतर इंग्लंडला क्लिन स्वीप

IND vs ENG : गौतम गंभीरच्या टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी, १३ वर्षानंतर इंग्लंडला क्लिन स्वीप

Published Feb 12, 2025 08:42 PM IST

IND vs ENG 3rd ODI Highlights : भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा १४२ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली आहे.

IND vs ENG : गौतम गंभीरच्या टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी, १३ वर्षानंतर इंग्लंडला क्लिन स्वीप
IND vs ENG : गौतम गंभीरच्या टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी, १३ वर्षानंतर इंग्लंडला क्लिन स्वीप (PTI)

अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा १४२ धावांनी पराभव केला आहे. टीम इंडियाने प्रथम खेळताना ३५६ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती, ज्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ २१४ धावांवर गारद झाला.

भारतीय संघाच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो शुभमन गिल ठरला. गिलने ११२ धावांची शतकी खेळी केली. तर गोलंदाजीत भारताच्या प्रत्येक गोलंदाजाने  विकेट घेतली.

भारतीय संघाने हा सामना १४२ धावांनी जिंकला. याआधी टीम इंडियाने मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना ४ गडी राखून जिंकला होता. अशा प्रकारे टीम इंडियाने १३ वर्षांनंतर द्विपक्षीय वनडे मालिकेत इंग्लंडला क्लीन स्वीप दिला आहे. टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्माच्या काळात हा विक्रम घडला आहे.

यापूर्वी ऑक्टोबर २०११ मध्ये भारतीय संघाने ५ वनडे सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड संघाचा ५-० असा धुव्वा उडवला होता. त्यावेळीही इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. यावेळीही असेच काहीसे घडले आहे. पण यावेळी या मालिकेत फक्त ३ एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या दुसऱ्याच षटकातच त्याचा निर्णय चांगला असल्याचे दिसून आले कारण कर्णधार रोहित शर्मा केवळ १ धाव घेऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.

मात्र त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी ११६ धावांची भागीदारी करत इंग्लंडच्या गोलंदाजांना घाम फोडला. तर श्रेयस अय्यरसह गिलने १०४ धावांची भर घातली. विराट कोहलीने ५२ आणि अय्यरने ७८ धावांचे योगदान दिले.

शुभमन गिलचे वनडे कारकिर्दीतील ७ वे शतक

शुभमन गिल इंग्लंडविरुद्धच्या मालिकेच्या सुरुवातीपासूनच चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने पहिल्या सामन्यात ८७ धावा केल्या आणि नंतर कटकमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात ६० धावा केल्या. अखेर तिसऱ्या सामन्यात त्याला त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ७ वे शतक पूर्ण करण्यात यश आले.

गिल हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ७ शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे, त्याने केवळ ५० डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.

भारतीय गोलंदाजही चमकले

भारतीय फलंदाजांनी प्रथम ३५६ धावांची मोठी धावसंख्या स्कोअरबोर्डवर उभारली आणि उर्वरित काम गोलंदाजांनी पूर्ण केले. फिल सॉल्ट आणि बेन डकेट यांनी नियमितपणे इंग्लंडला मालिकेत चांगली सुरुवात करून दिली, पण बाकीच्या फलंदाजांना त्याचा फायदा उठवता आला नाही.

यावेळी दोघांमध्ये ६० धावांची सलामीची भागीदारी झाली, मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी इतकं वर्चस्व गाजवलं की १५४ धावसंख्येपर्यंत इंग्लंडचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता.

येथून इंग्लंडचा पराभव निश्चित होता. कर्णधार जोस बटलर चांगलाच फॉर्मात आहे, मात्र तिसऱ्या सामन्यात तो केवळ ६ धावा करून बाद झाला आणि जो रूटही २४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

भारताकडून अर्शदीप सिंग, हर्षित राणा, अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या यांनी २-२ बळी घेतले. वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांनाही प्रत्येकी १ विकेट घेण्यात यश आले.

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या