India vs England 2nd Test Day 2, Vizag : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून (२ फेब्रुवारी) विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. आज (३ फेब्रुवारी) सामन्याचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव ३९६ धावांवर आटोपला.
प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांवर गारद झाला. यानंतर आता पहिल्या डावाच्या जोरावर भारताला १५३ धावांची आघाडी मिळाली आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने ६ विकेट घेतल्या. बुमराहने जेम्स अँडरसनला बाद करून इंग्लंडचा डाव संपवला.
भारताच्या ३९६ धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडनेही चांगली सुरुवात केली होती. त्यांनी पहिल्या विकेटसाठी पन्नास धावा जोडल्यानंतर लागोपाठ विकेट गमावल्या. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात जॅक क्रॉलीने त्याची विकेट फेकली. क्रॉलीच्या विकेटमुळे इंग्लंडसाठी अडचणी निर्माण झाल्या आणि त्यांनी रूट आणि पोपच्या रूपाने लागोपाठ दोन विकेट गमावल्या. यानंतर इंग्लंडचा डाव शेवटपर्यंत सावरू शकला नाही.
एकेकाळी इंग्लिश संघही पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत होते, पण वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडचे कंबरडे मोडले. कुलदीप यादवने बुमराहला चांगली साथ दिली. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने ७८ चेंडूंचा सामना करताना सर्वाधिक ७६ धावा केल्या. ज्यामध्ये ११ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.
त्याच्याशिवाय इंग्लंडच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही. ४७ धावा करणारा बेन स्टोक्स संघाकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता.
भारताकडून जसप्रीत बुमराहने ४५ धावांत ६ विकेट घेतल्या. तर कुलदीप यादवने ३ विकेट मिळवले.
संबंधित बातम्या