मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG Pitch Report : इंग्लंडच्या संघात तीन फिरकीपटू, पण हैदराबादची पीच नेमकी असेल तरी कशी? पाहा

IND vs ENG Pitch Report : इंग्लंडच्या संघात तीन फिरकीपटू, पण हैदराबादची पीच नेमकी असेल तरी कशी? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 24, 2024 09:23 PM IST

IND vs ENG 1st Test Pitch Report: इंग्लंडने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ३ फिरकीपटूंचा समावेश केला आहे. त्याचवेळी रोहित शर्मानेदेखील तीन फिरकीपटूंसोबत खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत.

ind vs eng 1st test match pitch report
ind vs eng 1st test match pitch report (AP)

IND vs ENG 1st Test Pitch Report : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांची मालिका २५ जानेवारीपासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या मैदानावर ५ वर्षांनंतर कसोटी सामना खेळला जाणार आहे. अशा परिस्थितीत, हैदराबादची पीच कशी असेल, याबाबत जाणून घेऊया.

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही मदत करते. मात्र येथे फिरकीपटूंचे वर्चस्व पाहायला मिळेल. ही खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अधिक उपयुक्त ठरेल. येथील खेळपट्टी कोरडी असल्याचे सांगितले जात आहे. अशा स्थितीत खेळ जसजसा पुढे जाईल तसतसा चेंडू निश्चितच अधिक टर्न होईल. 

या सामन्यासाठी इंग्लंडने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ३ फिरकीपटूंचा समावेश केला आहे. त्याचवेळी रोहित शर्मानेदेखील तीन फिरकीपटूंसोबत खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत.

राजीव गांधी स्टेडियमवर टीम इंडियाचा दबदबा

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर तब्बल ५ वर्षांनंतर कसोटी सामना होत आहे. याआधी या मैदानावर २०१८ साली भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी सामना खेळला गेला होता.तो सामना भारताने १० गडी राखून जिंकला होता. 

या मैदानावर आतापर्यंत ५ कसोटी सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने ४ सामने जिंकले असून १ सामना अनिर्णित राहिला आहे. या ४ सामन्यांपैकी भारताने २ सामने डावाच्या फरकाने जिंकले आहेत आणि एक सामना सामना १० विकेटने जिंकला आहे.

आर अश्विन हा या मैदानावर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने ४ कसोटी सामन्यात २७ विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे, रवींद्र जडेजाने ३ सामन्यात १५ विकेट घेतल्या आहेत.

कसोटीत भारत-इंग्लंड हेड-टू-हेड आकडेवारी

भारत आणि इंग्लंडमध्ये आतापर्यंत १३१  कसोटी सामने खेळले गेले आहेत. यात इंग्लंडने ५० सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर टीम इंडियाने ३१ सामने जिंकले आहेत. तर ५० कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.

तसेच, भारतीय भूमीवर इंग्लंडने ६४ कसोटी सामने खेळले आहेत. यातील २२ सामने भारताने जिंकले असून १४ सामन्यात इंग्लंडने बाजी मारली आहे. तर २८ कसोटी सामने अनिर्णित राहिले.

भारताने ११ वर्षात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही

इंग्लंडने २०१२ मध्ये भारताला भारतीय भूमीवर कसोटी मालिकेत २-१ ने पराभूत केले होते. तेव्हापासून भारताने भारतात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. 

२०१२ पासून टीम इंडियाने भारतात १६ कसोटी मालिका खेळल्या आहेत आणि त्या सर्व जिंकल्या आहेत. 

घरच्या मैदानावर सलग सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याच्या बाबतीत टीम इंडिया अव्वल आहे. भारताशिवाय कोणत्याही संघाला घरच्या मैदानावर सलग १० पेक्षा जास्त कसोटी मालिका जिंकता आलेल्या नाहीत.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi