Joe Root new Records: भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटने इतिहास रचला. या सामन्यात वैयक्तिक १० धावांचा टप्पा गाठताच त्याने नव्या विक्रमाला गवसणी घातली. तो भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. या कामगिरीसह त्याने भारकाता माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडित काढला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकरने ३२ सामन्यातील ५३ डावांत ५१.७३ च्या सरासरीने २ हजार ५३५ धावा केल्या. यामध्ये सात शतके आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे. इंग्लंडविरुद्धची १९३ धावांची त्याची सर्वोत्तम खेळी होती. तर, रुटने आतापर्यंत भारताविरुद्धच्या २६ कसोटी सामन्यांच्या ४६ डावांमध्ये ६३.६० च्या सरासरीने २ हजार ५४४ धावा केल्या आहेत, ज्यात नऊ शतके आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे. भारताविरुद्ध २१८ धावांची त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
इंग्लंडच्या पहिल्या डावात रुटने २१व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अक्षर पटेलच्या चेंडूवर चौकार मारून सचिनचा विक्रम मोडित काढला. या यादीत सुनील गावसकर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. गावस्करने इंग्लंडविरुद्ध ६७ डावांमध्ये ३८.२० च्या सरासरीने २ हजार ४८३ धावा केल्या आहेत. त्यानंतर अॅलिस्टर कुक चौथ्या आणि विराट कोहली पाचव्या स्थानावर आहे. कुकने भारताविरुद्ध ५४ डावांमध्ये ४७.६६ च्या सरासरीने २ हजार ४३१ धावा केल्या आहेत. तर, कोहलीने ५० डावांमध्ये ४२.३६ च्या सरासरीने १ हजार ९९१ धावा केल्या आहेत.
भारताविरुद्धच्या कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग अव्वल स्थानी आहे. पाँटिंगने भारताविरुद्धच्या २९ कसोटी सामन्यांमध्ये २ हजार ५५५ धावा केल्या होत्या. भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करणारा फलंदाज बनण्यापासून जो रूट थोडाच धावा दूर आहे.
रुटने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ४००० धावाही पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज देखील आहे. दरम्यान, २०१९ पासून सुरु झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये रूटने ४८ कसोटी सामन्यात ४००० धाव पूर्ण केल्या आहेत. ज्यात १२ शतके आणि १६ अर्धशतकांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या