मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG 1st Test Day 3 : टीम इंडिया ४३६ धावांवर ऑलआऊट, जडेजाचं शतक हुकलं, जो रूटचे सर्वाधिक विकेट

IND vs ENG 1st Test Day 3 : टीम इंडिया ४३६ धावांवर ऑलआऊट, जडेजाचं शतक हुकलं, जो रूटचे सर्वाधिक विकेट

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 27, 2024 10:34 AM IST

IND vs ENG 1st Test Day 3 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू आहे. आज (२७ जानेवारी) सामन्याचा तिसरा दिवस आहे.

IND vs ENG 1st Test Day 3
IND vs ENG 1st Test Day 3 (REUTERS)

India vs England Hyderabad Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील हैदराबाद कसोटीत टीम इंडियाने पहिल्या डावात सर्वबाद ४३६ धावा केल्या आहेत. अशा प्रकारे टीम इंडियाची पहिल्या डावात १९० धावांची आघाडी आहे. 

इंग्लंडने पहिल्या डावात केवळ २४६ धावा केल्या होत्या.भारतीय फिरकी गोलंदाजांसमोर इंग्लंडचे फलंदाज लवकर बाद झाले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक ७० धावा केल्या होत्या.

भारताकडून पहिल्या डावात रविंद्र जडेजाने सर्वाधिक ८७ तर केएल राहुलने ८६ धावांची खेळी केली. इंग्लंडच्या सर्व १० विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या. जो रूटने ४ विकेट घेतल्या. जो रूटचा कसोटीतील हा दुसरा सर्वोत्तम गोलंदाजी स्पेल आहे. यापूर्वी २०२१ मध्ये त्याने अहमदाबादमध्ये भारताविरुद्ध ८ धावांत ५ बळी घेतले होते.

तिसऱ्या दिवशी म्हणजे आज (२७ जानेवारी) भारताने ७ बाद विकेट्सवर ४२१ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली आणि १५ धावांत भारताने आपले उर्वरित ३ विकेट गमावल्या. भारताला आजचा पहिला धक्का जो रूटने दिला. त्याने डावाच्या १२० व्या षटकात लागोपाठ दोन चेंडूत दोन बळी घेतले. सर्वप्रथम रूटने ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर जडेजाला एलबीडब्ल्यू आऊट केले.

तो १८० चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८७ धावा करून बाद झाला. त्याचवेळी पुढच्याच चेंडूवर जसप्रीत बुमराह क्लीन बोल्ड झाला. बुमराहला खातेही उघडता आले नाही. 

यानंतर रेहान अहमदने अक्षर पटेलला क्लीन बोल्ड करून भारताचा डाव ४३६ धावांवर संपुष्टात आणला. अक्षरने १०० चेंडूंत ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४४ धावांची खेळी केली. 

तत्पूर्वी, दुसऱ्या दिवशीही (२६ जानेवारी) रूटने पहिली विकेट घेतली होती. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या यशस्वी जैस्वालला त्याने पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. यशस्वीने ७४ चेंडूंत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८० धावा केल्या होत्या. त्याचवेळी राहुलचेही शतक हुकले. त्याने १२३ चेंडूंत ८ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ८६ धावांची खेळी केली. केएस भरत ४१ धावा, अश्विन १ धावा, श्रेयस अय्यर ३५, शुभमन गिल २३ आणि कर्णधार रोहित शर्मा २४ धावा करून बाद झाले.

तर इंग्लंडकडून रुटने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या, तर टॉम हार्टले आणि रेहानने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. जॅक लीचने १ विकेट घेतली.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi