India vs England T20 Series 2025 : भारत आणि इंग्लंड दोन्ही संघ २०२५ मधील पहिली मालिका खेळण्यासाठी सज्ज आहेत. २२ जानेवारीपासून दोन्ही संघांमधील टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर होणार आहे. या मैदानावर शेवटचा टी-२० सामना २०२२ मध्ये खेळला गेला होता, ज्यामध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा १७ धावांनी पराभव केला होता.
टी-20 क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा सामना टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये खेळला गेला होता, ज्यामध्ये टीम इंडियाने ६८ धावांनी विजय मिळवला होता.
टी-20 क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत भारत आणि इंग्लंड २४ वेळा आमनेसामने आले आहेत. टीम इंडियाने १३ वेळा तर इंग्लंडने ११ वेळा विजय मिळवला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात ईडन गार्डन्सवर दोन सामने झाले आहेत. या दोन्ही टी-20 सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव केला आहे.
तर टी-20 मालिकेबद्दल बोलायचे झाले तर दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत एकूण ८ टी-20 मालिका खेळल्या गेल्या आहेत. त्यापैकी ४ मालिका भारताने तर ३ मालिका इंग्लंडने जिंकल्या आहेत. एक मालिका अनिर्णित राहिली.
कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर झालेल्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांबद्दल बोलायचे तर, आतापर्यंत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ५ वेळा विजय मिळवला आहे, तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ७ वेळा विजय मिळवला आहे.
या मैदानावर आतापर्यंत २०० धावांचा टप्पा फक्त एकदाच पार झाला आहे. या मैदानावर पाकिस्तानने २०१६ मध्ये बांगलादेशविरुद्ध २०१ धावांचा पाऊस पाडला होता. हा विक्रम आतापर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही. ईडन गार्डन्सवर भारताची सर्वोच्च धावसंख्या १८६ धावा आहे, जी त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध केली होती.
संबंधित बातम्या