Shreyas Iyer Fifty IND vs ENG 1st ODI Match : टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पूर्वी चांगल्या फॉर्मात असल्याचे दाखवून दिले आहे. इंग्लंडविरुद्ध नागपुरात खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले आहे. अय्यरने अवघ्या ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
यासोबतच त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या प्लेइंग इलेव्हनमधील आपला दावा मजबूत केला आहे. तसेच, आयपीएल २०२५ साठी पंजाब किंग्जलाही आनंदाची बातमी दिली आहे.
अय्यरचे हे एकदिवसीय सामन्यातील दुसरे जलद अर्धशतक आहे. यापूर्वी त्याने २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध २८ चेंडूत अर्धशतक केले होते.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यर फलंदाजीला आला तेव्हा भारतीय कर्णधार रोहित शर्मा केवळ २ धावा करून बाद झाला. रोहित बाद झाल्यामुळे टीम इंडियाने अवघ्या १९ धावांत दोन विकेट गमावल्या होत्या. येथून श्रेयस अय्यरने इंग्लंडच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला.
श्रेयस अय्यरने झटपट धावा केल्या आणि अवघ्या ३० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचा डाव ५९ धावांवर संपला. त्याने ३६ चेंडूत ५९ धावांच्या खेळीत ९ चौकार आणि २ षटकार मारले.
भारतासाठी सर्वात जलद वनडे अर्धशतक अजित आगरकर याने झळकावले होते. आगरकरने २००० साली झिम्बाब्वेविरुद्ध केवळ २१ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. अजित आगरकर टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता देखील आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसरे सर्वात जलद अर्धशतक कपिल देवने केले होते. त्याने १९८३ मध्ये २२ चेंडूत अर्धशतक केले होते. राहुल द्रविड आणि युवराज सिंग यांनीही एकदिवसीय सामन्यात २२ चेंडूत अर्धशतके झळकावली आहेत. या यादीत सूर्यकुमार यादवच्या नावाचाही समावेश आहे, ज्याने २४ चेंडूत एकदिवसीय अर्धशतक ठोकले आहे.
या सामन्यातील इंग्लंडच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर तेही अगदी सामान्य होती. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, जॉस बटलर आणि जेकब बेथेल यांच्याशिवाय इंग्लंडच्या इतर कोणत्याही फलंदाजाला फलंदाजीत आपली छाप सोडता आली नाही. अशा स्थितीत पाहुणा संघ केवळ २४८ धावांवरच गार झाला.
तर गोलंदाजीत हर्षित राणाने टीम इंडियासाठी दमदार कामगिरी केली. हर्षितने टीम इंडियाकडून वनडे पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात ३ विकेट्स घेतल्या. हर्षितशिवाय रवींद्र जडेजाने दमदार खेळ दाखवत ३ बळी घेतले, तर मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.
संबंधित बातम्या