भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू आहे. आज तिसऱ्या दिवसाचा (२७ जानेवारी) खेळ संपेपर्यंत इंग्लंडने त्यांच्या दुसऱ्या डावात ६ गडी गमावून ३१६ धावा केल्या आहेत. इंग्लंडची महत्वपूर्ण १२६ धावांची आघाडी झाली आहे.
तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा ओली पोप १४८ धावांवर तर रेहान अहमद १६ धावांवर नाबाद परतले आहेत. पोपने आपल्या आतापर्यंतच्या खेळीत १७ चौकार मारले आहेत.
तत्पूर्वी, इंग्लंडने पहिल्या डावात २४६ धावा केल्या होत्या. तर भारताने पहिल्या डावात ४३६ धावा केल्या होत्या. पहिल्या डावाच्या आधारे भारताकडे १९० धावांची आघाडी होती.
इंग्लंडने दुसऱ्या डावाबद्दल बोलायचे झाले तर दुसऱ्या डावात इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज जॅक क्राउली आणि बेन डकेट यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी झाली. बेन डकेट ४५ धावा करून बाद झाला तर जॅक क्रॉलीने ३१ धावांचे योगदान दिले. पण जो रूट आणि बने स्टोक्स स्वस्तात बाद झाले.
अश्विनने जॅक क्रॉलीला बाद केले. त्यानंतर जसप्रीत बुमराहने बेन डकेटच्या रुपात दुसरी विकेट घेतली. डकेट ४७ धावांवर क्लीन बोल्ड झाला. यानंतर बुमराहने जो रूटला २ धावांवर पायचीत केले. रवींद्र जडेजाने जॉनी बेअरस्टोला तर अश्विनने बेन स्टोक्सला क्लीन बोल्ड केले.रूट, स्टोक्स आणि बेयरस्टोला विशेष काही करता आले नाही.
१६३ धावांवर पाच गडी बाद झाल्यानंतर, ऑली पोप आणि बेन फॉक्स यांनी ११२ धावांची झुंजार भागीदारी केली. या भागीदारीने इंग्लंडला सामन्यात परत आणले. फॉक्सने ८१ चेंडूत ३४ धावा केल्या. फॉक्स बाद झाल्यानंतर रेहान-पोपने इंग्लंडचे आणखी नुकसान होऊ दिले नाही.
संबंधित बातम्या