चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा पराभव केला. आता दोन्ही संघांमधील दुसरा सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये सुरू होत आहे. ग्रीन पार्क स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ही खेळपट्टी लाल मातीची असेल की काळ्या मातीची? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळपट्टी लाल मातीची होती. खेळपट्टीत चांगली उसळी होती आणि पीचवर टर्नही दिसला.
ईएसपीएनक्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, कानपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याची खेळपट्टी काळ्या मातीची असेल. ही खेळपट्टी पूर्वीपेक्षा खूपच सपाट असेल आणि येथे कमी उसळी असेल. तसेच, जसजसा सामना पुढे जाईल तसतशी खेळपट्टी संथ होत जाईल. तसेच, येथे फिरकीपटूला अधिक टर्न मिळण्याची आशाही कमी आहे.
याचा स्पष्ट अर्थ या खेळपट्टीवर फलंदाजांना फारसा त्रास होणार नाही आणि ते सहज धावा करू शकतील. काळ्या मातीची खेळपट्टी असल्याने ती कालांतराने संथ होईल. अशा स्थितीत संघ येथे तीन वेगवान गोलंदाज खेळवणार नाहीत. भारत येथे तीन फिरकीपटूंसह जाऊ शकतो
बांगलादेशही तीन फिरकीपटूंनाही मैदानात उतरवू शकतो. चेन्नईमध्ये भारताने जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाशदीप खेळले होते. कानपूरमध्ये या तिघांपैकी एकजण बाहेर जाऊ शकतो आणि कुलदीप यादव किंवा अक्षर पटेल यांना संधी मिळू शकते.
दरम्यान, हा सामना बांगलादेशसाठी मोठा चिंतेचा ठरू शकतो. त्यांचा मुख्य फिरकीपटू आणि अनुभवी खेळाडू शाकिब अल हसनच्या बोटाला दुखापत झाली आहे. चेन्नई कसोटी सामन्यात त्याच्या बोटाला दुखापत झाली होती, बुमराहचा चेंडू त्याच्या बोटावर आदळला होता. आता तो खेळू शकतो की नाही हे पाहणे बाकी आहे.