भारत आणि बांगलादेश यांच्यात आज शुक्रवारपासून (२७ सप्टेंबर) दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर आता बांगलादेशचा संघ पहिल्या डावात फलंदाजी करत आहे.
या दरम्यान, या डावात टीम इंडियाचा स्टार खेळाडू यशस्वी जैस्वालने आश्चर्यकारक कामगिरी केली. आकाशदीप याच्या चेंडूवर यशस्वीने थरारक झेल घेतला. यशस्वीचा हा झेल इतका उत्कृष्ट होता की पंचांनाही त्यावर विश्वास बसत नव्हता.
डावाच्या ९व्या षटकात आकाशदीपने बांगलादेशी फलंदाज झाकीर हसनला अप्रतिम चेंडू टाकला, हा चेंडू झाकीरच्या बॅटला लागून गलीच्या दिशेला गेला, तेथे उभ्या असलेल्या यशस्वी जैस्वालने सुर मारत झेल टिपला. चेंडू जैस्वालपर्यंत पोहोचला नव्हता पण त्याने चपळाई दाखवत चेंडू तळहातावर पकडला.
प्रथमदर्शनी चेंडू मैदानाला स्पर्श झाल्याचे दिसत होते, पण यशस्वी आणि स्लिपमध्ये उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकांना हा झेल पूर्णपणे स्वच्छ असल्याची खात्री होती. तिसऱ्या पंचांनाही यशस्वीचा झेल योग्य वाटला आणि त्यामुळे बांगलादेशला पहिला धक्का बसला.
बांगलादेशचा सलामीवीर झाकीर हसन क्रीजवर आल्यापासून संघर्ष करताना दिसला. शादमानसह झाकीरने एकूण २४ चेंडूंचा सामना केला, मात्र यादरम्यान त्याला खातेही उघडता आले नाही. इतका वेळ क्रीजवर राहूनही एकही धाव काढू न शकल्याने झाकीर हसन खूपच निराश झाला. मात्र, या काळात बांगलादेशकडून शादमान इस्लामने भारतीय गोलंदाजांचा धैर्याने सामना केला.
ग्रीन पार्क स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा २८० धावांनी पराभव केला होता. टीम इंडिया कानपूरमध्ये २०० ने मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल.