विशेष म्हणजे, बांगलादेशचा संघ पाकिस्तानला पाकिस्तानात हरवून भारतात आला आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला असेल. बांगलादेशने पाकिस्तानला २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी धुळ चारली होती.
दरम्यान, भारत आणि बांगलादेश कसोटी मालिकेसाठी दोन्ही देशांनी आपापले संघ जाहीर केले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून ही मालिका खूप महत्त्वाची असेल, पण त्याआधी भारत-बांगलादेश यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल जाणून घेऊया.
भारत आणि बांगलादेश यांच्यात आजपर्यंत एकूण ८ कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये एक मालिका वगळता प्रत्येक वेळी टीम इंडियाने विजय मिळवला आहे. एक मालिका अनिर्णित राहिली आहे, म्हणजेच बांगलादेशला आजपर्यंत भारताविरुद्ध एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.
बांगलादेशने भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकली नाही. तसेच, आजपर्यंत झालेल्या सर्व ८ मालिकांमध्ये बांगलादेशला कधीही टीम इंडियाला कसोटी सामन्यात पराभूत करता आलेले नाही.
दोन्ही संघांनी आतापर्यंत १३ कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी ११ वेळा भारताने विजय मिळवला असून २ सामने अनिर्णित राहिले आहेत.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील आगामी मालिका १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नईत, तर दुसरा सामना कानपूरमध्ये २७ सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे.
यानंतर ग्वाल्हेर, दिल्ली आणि हैदराबादमध्ये या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये तीन टी-20 सामनेही खेळवले जाणार आहेत.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील शेवटची कसोटी मालिका २०२२ मध्ये खेळली गेली होती. त्यावेळी पहिल्या सामन्यात टीम इंडियाने १८८ धावांनी विजय मिळवला होता तर दुसऱ्या रोमहर्षक सामन्यात भारताने ३ गडी राखून विजय मिळवला होता. त्या मालिकेत चेतेश्वर पुजारा खूप चांगल्या फॉर्ममध्ये होता.