भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून प्रारंभ झाला आहे. मालिकेतील पहिला सामना आज (६ ऑक्टोबर) ग्वाल्हेरच्या माधवराव सिंधिया स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यातून वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि नितीश कुमार रेड्डी यांना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर फिरकीपटू वरुण चक्रवर्ती तीन वर्षांनंतर भारतीय संघासाठी टी-20 सामना खेळणार आहे. नितीशला पार्थिव पटेलने तर मयंक यादव याला मुरली कार्तिकने डेब्यू कॅप दिली.
दरम्यान, या सामन्यातून तिलक वर्मा, रवी बिश्नोई, हर्षित राणा आणि जितेश शर्मा हे खेळाूडू बाहेर आहेत.
बांगलादेश : लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), परवेझ हुसैन इमॉन, तौहीद ह्रदोय, महमुदुल्ला, झाकीर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शौरीफुल इस्लाम.
भारत : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रायन पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव.
भारत आणि बांगलादेश संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड जाणून घेऊया. भारताने बांगलादेशविरुद्ध आतापर्यंत १४ पैकी १३ सामने जिंकले आहेत. बांगलादेशला फक्त एकच विजय मिळाला होता, जो २०१९ मध्ये दिल्लीत आला.
ग्वाल्हेरच्या माधवराव सिंधिया या नवीन स्टेडियमवर प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जात आहे. या मैदानात लाल मातीची खेळपट्टी आहे, जी चांगली उसळी आणि वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर मानली जाते. येथे सामन्याच्या सुरुवातीला गोलंदाजांना चांगली मदत मिळू शकते, पण जसजसा खेळ पुढे जाईल तसतशी फलंदाजांसाठी फलंदाजी सोपी होत जाईल. आता सामन्यादरम्यान येथील खेळपट्टी कशी राहते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या