एखाद्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी केवळ ३५ षटकांचा खेळ व्हावा आणि त्यानंतरचे सलग दोन दिवस पावसामुळे वाया गेलेले असतील, अशा स्थितीत कोणता संघ कसोटी सामना जिंकण्याचा विचार करू शकतो? पण हे रोहित शर्माच्या संघाने हे करून दाखवले आहे.
टीम इंडियाने ड्रॉकडे जाणाऱ्या सामन्यात जीव आणला आणि तो सामना जिंकला. अवघ्या दोन दिवसांत टीम इंडियाने ४ इनिंग खेळून कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
कानपूर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव केला. यासह दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी जिंकली. पहिल्या दिवशी केवळ ३५ षटकेच खेळता आली. यादरम्यान बांगलादेशने तीन गडी गमावून केवळ १०७ धावा केल्या होत्या.
खराब प्रकाशामुळे पहिल्या दिवशी संपूर्ण खेळ होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी पावसामुळे एकही चेंडू टाकता आला नाही. खराब आउटफिल्डमुळे तिसऱ्या दिवशीही एकही चेंडू न टाकता दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला.
चौथ्या दिवशी सामना सुरू झाला, तेव्हा भारताने बांगलादेशला २३३ धावांत गुंडाळले. यानंतर दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारत फलंदाजीसाठी उतरला आणि टीम इंडियाने आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांना चकित केले. संघाची फलंदाजी पाहता हा कसोटी सामना नसून टी-२० सामना असल्याचे जाणवत होते.
रोहितने भारतीय डावाच्या दुसऱ्या षटकात खालिद अहमद याच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकले. त्याआधी पहिल्या षटकात यशस्वी जैस्वालने तीन चौकार ठोकले होते.
इथून बांगलादेश संघाला टीम इंडियाचे इरादे काय आहेत हे कळले. रोहितच्या या दोन षटकारांनी तुफानी फलंदाजीचा पाया रोवला आणि त्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांनी मागे वळून पाहिले नाही.
रोहितचे ते दोन षटकार सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. भारतीय कर्णधार ११ चेंडूत केवळ २३ धावा करून बाद झाला, पण त्याच्या खेळीने बांगलादेशला बॅकफूटवर ढकलले आणि सामना भारताकडे वळवला.
सामना जिंकल्यानंतर संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी रोहितच्या फलंदाजीचे आणि कर्णधाराचे कौतुक केले. नायर म्हणाला, “यशस्वी आणि रोहितने मैदानावर ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यामुळे ड्रेसिंग रूममधील वातावरण बदलले.
रोहित शर्माला इथे खूप श्रेय मिळायला हवे, कारण आपण असे खेळू आणि जिंकू अशी कल्पना रोहित शर्माचीच होती. फलंदाजी असो की गोलंदाजी, रोहित शर्माची विचारसरणी खूप आक्रमक आहे'.