भारतीय फलंदाज रिंकू सिंगनं नुकताच त्याच्या डाव्या हातावर टॅटू काढला आहे. या टॅटूमध्ये सूर्याचं चित्र असून त्यात Gods Plan (देवाची योजना) अशी अक्षरं लिहिली आहेत. रिंकू सिंगनं स्वत: या टॅटूचे रहस्य सांगितले आहे.
रिंकूने आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्स (जीटी) विरुद्ध सलग पाच षटकार ठोकून कोलकाता नाईट रायडर्सला संस्मरणीय विजय मिळवून दिला होता. यश दयालच्या षटकात त्याने ही कामगिरी केली. त्यानंतर रिंकू बराच चर्चेत आला होता. ते पाच षटकार म्हणजे माझं आयुष्य बदलणारा क्षण होता असं तो म्हणतो आणि म्हणूनच त्यानं हातावर असा टॅटू काढला आहे.
बीसीसीआयनं शनिवारी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रिंकू म्हणाला, "सर्वांना माहीत आहे की माझ्या तोंडी गॉड्स प्लान हा शब्द असतो. तो बराच प्रसिद्ध आहे. मी जे बोलतो, त्याचा कायमचा टॅटू काढला. लोक मला या नावाने थोडे फार ओळखतात. मी सूर्याच्या मध्यभागी गॉड्स प्लॅन टॅटू काढला. पण माझ्या या टॅटूची महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाच षटकार. मैदानाच्या ज्या भागात मी पाच षटकार मारले, त्या दिशा टॅटूमध्ये दाखवल्या आहेत. मी दोन षटकार कव्हर केले होते आणि समोरच्या दिशेने दोन षटकार मारले होते. एक पायाजवळ हाणला होता. तिथून माझं आयुष्य बदललं आणि लोक मला ओळखू लागले. ती आठवण म्हणून टॅटू काढून घ्यावा असं वाटलं.
आयपीएल २०२३ नंतर रिंकूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ऑगस्ट २०२३ मध्ये आयर्लंडविरुद्ध खेळला होता. त्याने भारताकडून आतापर्यंत दोन वनडे आणि २३ टी-२० सामने खेळले असून त्याने अनुक्रमे ५५ आणि ४१८ धावा केल्या आहेत.
रिंकू रविवारी (६ ऑक्टोबर) सुरू होणाऱ्या भारत-बांगलादेश टी-२० मालिकेत दिसणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना ग्वाल्हेरच्या मैदानावर होणार आहे. जुलै २०२४ मध्ये श्रीलंका दौऱ्यावर भारताने शेवटची टी-२० मालिका खेळली होती, यात रिंकूला फारसा प्रभाव पाडता आला नाही.