रवींद्र जडेजा कधीही भारतीय फिरकी आक्रमणाचे नेतृत्व करेल असे वाटत नाही. पांढऱ्या चेंडूच्या फॉर्मेटमध्ये कुलदीप यादव किंवा युझवेंद्र चहल फिरकी विभागाचे नेतृत्व करताना दिसतात, तर लाल चेंडूमध्ये रविचंद्रन अश्विन फिरकी विभागाची जबाबदारी सांभाळतात.
मात्र, संघ जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा जडेजा प्रत्येक विभागात आपले १०० टक्के देऊन संघातील त्याचे अस्तित्व जाणवून देतो. हेच आपण चेन्नई कसोटीत पाहिले.
आता बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. हा सामना कानपूर येथे होईल. कानपूर कसोटीत जडेजाला कसोटी क्रिकेटमध्ये ३०० बळी पूर्ण करण्याची संधी आहे. जडेजा एक विकेट घेताच तो एका स्पेशल क्लबमध्ये सामील होईल. तो कसोटीत ३०० विकेट आणि ३००० धावा करणाऱ्य खेळाडूंच्या क्लबमध्ये सामील होईल.
जड्डूच्या नावावर सध्या कसोटीत २९९ विकेट आणि ३१२२ धावा आहेत. आत्तापर्यंत अश्विन आणि कपिल देव या दोन भारतीय खेळाडूंसह जगातील केवळ १० खेळाडूंना अशी कामगिरी करता आली आहे.
स्टुअर्ट ब्रॉड, शेन वॉर्न, कपिल देव, डॅनियल व्हिटोरी, चामिंडा वास, शॉन पोलॉक, इयान बॉथम, आर अश्विन, इम्रान खान आणि रिचर्ड हॅडली यांची नावे कसोटीत ३०० बळी आणि ३००० धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये आर अश्विन आणि जडेजाने मिळून साडेसहा हजार धावा आणि ८२१ बळी घेतले आहेत.
दरम्यान, रवींद्र जडेजाने एकट्याने टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. पण त्याच्या नावाची विराट-रोहितच्या नावाइतकी चर्चा होत नाही.
चेन्नई कसोटीतही हेच घडले. भारताने ६ गडी गमावल्यानंतर जडेजा आणि अश्विन यांनी सातव्या विकेटसाठी १९९ धावांची भागीदारी करून भारताला ३७६ धावांपर्यंत नेले. जडेजाने ८६ धावा केल्या, पण चर्चा अश्विनच्या शतकावर केंद्रित झाली. जडेजाने सामन्यात ५ विकेट्स घेतल्या, पण अश्विनने दुसऱ्या डावात ६ विकेट घेत त्याला इथेही मागे सोडले.