Virat Kohli Struggles With Bat: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची जगातील दिग्गज क्रिकेटपटुंच्या यादीत गणना केली जाते. परंतु, चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहली संघर्ष करताना दिसला. या सामन्यातील पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात १७ धावा करून तो पव्हेलियनमध्ये परतला. मात्र, कानपूर कसोटी सामन्याची तयारी करत असताना विराट कोहली नेटमध्ये देखील संघर्ष करताना दिसला. नेटमध्ये फलंदाजी करताना विराट फक्त १५ चेंडू खेळून चार वेळा बाद झाला.
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा केली जात आहे. मात्र, या सामन्याची तयारी करत असताना भारताचा वेगवाग गोलंदाज जसप्रीत बुमराहने विराट कोहलीला नेटमध्ये खूप त्रास दिला. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, नेटमध्ये बुमराहने विराट कोहलीला अवघ्या १५ चेंडूत चार वेळा बाद केले. एवढेच नव्हेतर विराटला फिरकी गोलंदाज आर अश्विन, रवींद्र जाडेजा आणि अक्षर पटेल यांच्यासमोरही संघर्ष करताना दिसला.
विराट कोहलीला आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी ३५ धावांची गरज आहे. चेन्नई कसोटीपूर्वी तो या आकड्यापासून ५८ धावा दूर होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २७ हजार धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने त्याने ६२३ डावांमध्ये (२२६ कसोटी, ३९६ एकदिवसीय आणि एक टी-२०) अशी कामगिरी केली. कोहलीने आतापर्यंत ५९३ डावांमध्ये सर्व फॉरमॅटसह २६ हजार ९६५ धावा केल्या आहेत.
चेन्नईमध्ये झालेल्या सामन्यात ३५ वर्षीय फलंदाजाने घरच्या मैदानावर १२ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. ही कामगिरी करणारा कोहली हा सचिन तेंडुलकरनंतर दुसरा भारतीय फलंदाज ठरला. कोहलीने आपल्या २१९व्या सामन्यात हा विक्रम केला. कोहलीने घरच्या मैदानावर ५८.८४ च्या सरासरीने १२ हजार धावा पूर्ण केल्या आहेत, ज्यात ३८ शतके आणि ५९ अर्धशतकांचा समावेश आहे. तर, सचिन तेंडुलकरने २५८ सामन्यांमध्ये ५०.३२ च्या सरासरीने १४ हजार १९२ धावा केल्या आहेत, ज्यात ४२ शतके आणि ७० अर्धशतकांचा समावेश आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात उद्यापासून (२७ सप्टेंबर २०२४) कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन सामन्याच्या मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात बांगलादेशला हरवून २-० ने भारताचा मालिका जिंकण्याचा प्रयत्न असेल. भारताने पहिल्या कसोटी सामन्यात दमदार कामगिरी करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.