India vs Bangladesh 2nd Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याला शुक्रवापासून (२७ सप्टेंबर २०२४) सुरुवात होत आहे. हा सामना कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियम येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा स्टार फिरकीपटू रवींद्र जडेजा इतिहास रचू शकतो. पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजीसह गोलंदाजीत धुमाकूळ घालणाऱ्या रवींद्र जडेजाला कसोटीत ३०० बळींचा टप्पा ओलांडण्याची सुवर्णसंधी आहे. चेन्नईत खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने पहिल्या डावात ८६ धावांचे योगदान दिले आणि सामन्यात एकूण पाच विकेट्सही घेतल्या.
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने फक्त एक विकेट घेतल्यास ३०० बळी घेणारा तो भारताचा सातवा गोलंदाज आणि चौथा फिरकीगोलंदाज ठरला. भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. या अनुभवी फिरकीपटूने भारताकडून १३२ सामन्यात ६१९ बळी घेतले आहेत. तसेच त्यांनी ३५ वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत.
रवींद्र जडेजाने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत एक विकेट घेतली तर तो कसोटीत ३०० आणि ३००० धावा करणारा तिसरा भारतीय क्रिकेटपटू बनेल. कपिल देव आणि आर अश्विनच्या स्पेशल लिस्टमध्ये त्याला स्थान मिळणार आहे. भारतीय खेळाडूंव्यतिरिक्त अन्य आठ क्रिकेटपटूंनी कसोटी क्रिकेटमध्ये ३०० बळी आणि ३००० धावा करण्याचा पराक्रम केला आहे. या यादीत इयान बॉथम, शेन वॉर्न, इम्रान खान, स्टुअर्ट ब्रॉड, रिचर्ड हॅडली, डॅनियल व्हिटोरी, शॉन पोलॉक आणि चामिंडा वास यांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता रवींद्र जडेजाचे संपूर्ण लक्ष कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटवर आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन कसोटी क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा पहिल्या क्रमांकावर आहे. जडेजाचे एकूण ४७५ रेटिंग गुण आहेत. जे त्याच्या कारकिर्दीतील उच्च रेटिंग आहे. याआधी ते इथे कधीच पोहोचले नाही. विशेष म्हणजे, दुसरी कसोटी बांगलादेशविरुद्धच होणार आहे, जी २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवली जाणार आहे. यातही जडेजा खेळणार हे जवळपास निश्चित आहे. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल झाले तरी जडेजाला बाहेर बसणे अशक्य आहे. याचा अर्थ जडेजाला आपली संख्या आणखी सुधारण्याची संधी आहे.