भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना रोमहर्षक वळणावर पोहोचला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवसाचा (३० सप्टेंबर) खेळ संपेपर्यंत बांगलादेशने त्यांच्या दुसऱ्या डावात २ गडी गमावून २६ धावा केल्या होत्या.
दरम्यान, सामन्याचा दुसरा आणि तिसरा दिवस पावसाने पूर्णपणे वाहून गेला होता. त्यानंतर सामना थेट चौथ्या दिवशी म्हणजेच, आज सुरू झाला.
आज बांगलादेशने आपला डाव ३ बाद १०७ धावांवरून पुढे वाढवला आणि सर्वबाद २३३ धावा केल्या. चौथ्या दिवसाच्या खेळात एकूण १८ विकेट पडल्या आणि दिवसभरात एकूण ४३७ धावा झाल्या.
बांगलादेशकडून दुसऱ्या डावात शादमान इस्लामने ७ धावा केल्या आणि पहिल्या डावातील शतकवीर मोमिनुल हक दुसऱ्या डावात अद्याप खातेही उघडू शकलेला नाही. दोघेही दिवसअखेर नाबाद परतले आहेत.
तत्पूर्वी, बांगलादेशच्या २३३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने आपला पहिला डाव २८५ धावांवर घोषित केला. भारताला ५१ धावांची आघाडी मिळाली. बांगलादेश पुन्हा फलंदाजीला आला तेव्हा शदमान इस्लाम आणि झाकीर हसन विकेट वाचवण्याच्या इराद्याने खेळताना दिसले. पण रविचंद्रन अश्विनने या बचावात्मक रणनीतीचा पुरेपूर फायदा उठवला.
अश्विनच्या फिरणाऱ्या चेंडूंनी दुसऱ्या डावात बांगलादेशचे २ बळी घेतले. चौथ्या दिवशी बांगलादेशची धावसंख्या २ गड्यांच्या मोबदल्यात २६ धावांवर पोहोचली असून दुसऱ्या डावात ते अजूनही भारतापेक्षा २६ धावांनी मागे आहे.
पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ ३५ षटकांचा खेळ झाला, ज्यामध्ये बांगलादेशने ३ विकेट गमावून १०७ धावा केल्या. चौथ्या दिवशी मैदानावर आल्यानंतर लगेचच ११ धावा करून मुशफिकुर रहीम बाद झाला, पण मोमिनुल हक दुसऱ्या टोकाकडून शेवटपर्यंत क्रीजवर राहिला. त्याने १०७ धावांची नाबाद खेळी खेळली आणि आपल्या संघाला २३३ धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले. तर भारताकडून पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ३ बळी घेतले.
भारताचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी येताच तुफानी फलंदाजीला सुरुवात केली. जैस्वाल आणि रोहितने मिळून केवळ ३ षटकात ५१ धावा केल्या होत्या. रोहित शर्मा झटपट ११ चेंडूत २३ धावा करून बाद झाला, तर दुसरीकडे जैस्वालने अवघ्या ३१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्याचा डाव ७२ धावांवर संपला.
सामन्याला फक्त एक दिवस शिल्लक असल्याने सर्व भारतीय फलंदाज वादळी फलंदाजी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरले होते. विराट कोहलीने ४७ धावा केल्या आणि केएल राहुलने ६८ धावांची वेगवान आणि संमिश्र खेळी खेळून भारताला २८५ धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने आपला डाव ९ बाद २८५ धावांवर घोषित केला.