भारत आणि बांगलादेश यांच्यात आज शुक्रवारपासून (२७ सप्टेंबर) दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
रोहितने प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही. म्हणजे कुलदीप किंवा अक्षर या दोघांनाही संधी मिळाली नाही. जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज या तीन वेगवान गोलंदाजांसह भारतीय संघ मैदानात उतरला आहे. तर अश्विन आणि जडेजा फिरकीपटूंची जबाबदारी सांभाळतील.
तर बांगलादेशचा कर्णधार नजमुलने प्लेइंग-११ मध्ये दोन बदल केले आहेत. वेगवान गोलंदाज तस्किन अहमद आणि नाहिद राणा यांच्या जागी तैजुल इस्लाम आणि खालिद अहमद यांना प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळाले आहे. शांतोने सांगितले की, त्यांना प्रथम फलंदाजीच करायची होती आणि नाणेफेक हरल्याने त्यांना फारशी अडचण येणार नाही.
बांगलादेश : शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद.
भारत: यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
दरम्यान, टीम इंडिया सध्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. रोहित आणि कंपनीने पहिला सामना २८० धावांनी जिंकला होता. त्याचबरोबर हा सामना बांगलादेशसाठीही खूप महत्त्वाचा आहे. पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी बांगलादेशला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक आहे.