भारत आणि बांगलादेश यांच्यातील कानपूर कसोटी सामन्याचा आज (१ ऑक्टोबर) पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. पाचव्या दिवशी बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या १४६ धावांवर गारद झाला. अशाप्रकारे भारतीय संघाला विजयासाठी ९५ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
रविचंद्रन अश्विन, रवींद्र जेडजा आणि जसप्रीत बुमराह यांनी बांगलादेशला दुसऱ्या डावात लवकर आऊट करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. आता भारताला विजयासाठी ९५ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
बांगलादेशच्या दुसऱ्या डावात जडेजा, अश्विन आणि बुमराह यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. बांगलादेशने पाचव्या दिवसाची सुरुवात २६/२ धावांवरून केली. संघाने तिसरी विकेट लवकर गमावली.
त्यानंतर चौथ्या विकेटसाठी शादमान इस्लाम आणि नजमुल हुसेन शांतो यांनी ५५ (८४) धावांची भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत नेण्याचा प्रयत्न केला. पण शादमान आणि शांतो यांच्यातील भागीदारी मोडताच बांगलादेशचा संघ गडगडला.
मात्र, शेवटी मुशफिकुर रहीम आणि खालिद अहम काही वेळ क्रीजवर उभे राहिले. या दोघांनी १०व्या विकेटसाठी १६ (३८) धावांची भागीदारी केली. लक्ष्य गाठण्यासाठी टीम इंडियाचे २ सत्र बाकी आहेत.
बांगलादेशसाठी दुसऱ्या डावात शादमान इस्लामने १० चौकारांच्या मदतीने सर्वाधिक ५० धावा केल्या. यादरम्यान भारताकडून जडेजा, अश्विन बुमराह, आकाश दीप यांनी विकेट घेतल्या. आकाशदीप याला १ विकेट मिळाली.
दरम्यान, या कसोटीचे दोन संपूर्ण दिवस पावसामुळे वाहून गेले होते, अशा स्थितीत हा सामना ड्रॉ होईल असे वाटत होते, पण टीम इंडियाने चौथ्या दिवशी आपल्या आक्रमक खेळाने हा सामना खूपच रोमांचक बनवला.
टीम इंडियाने पहिल्या डावात आक्रमक फलंदाजी करत ३४.४ षटकात ९ बाद २८५ धावा करून डाव घोषित केला. यशस्वी जैस्वालने ५१ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने संघासाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारली. याशिवाय केएल राहुलने ४३ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या होत्या. टीम इंडियाने स्फोटक फलंदाजीच्या बळावर पहिल्या डावात ५२ धावांची आघाडी मिळवली होती.