चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात भारताने ३७६ धावा केल्या. याला प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ केवळ १४९ धावा करू शकला. अशा प्रकारे भारतीय संघाला पहिल्या डावात २२७ धावांची मोठी आघाडी मिळाली.
यानंतर दुसऱ्या डावात टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र, या डावात विराट कोहलीने एक मोठा विक्रम केला आहे.
विराट कोहलीने भारतीय भूमीवर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १२ हजार धावांचा आकडा गाठला आहे. विराट कोहली पहिल्या डावात ६ धावा करून बाद झाला. त्याचवेळी दुसऱ्या डावातही विराटची बॅट शांत राहिली. यावेळी विराट कोहली १७ धावा करून बाद झाला.
विराट कोहलीने भारताच्या दुसऱ्या डावात पाचवी धाव घेताच मायदेशात १२००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. घरच्या मैदानावर तिन्ही फॉरमॅटमध्ये १२,००० धावा करणारा विराट कोहली जगातील ५वा फलंदाज ठरला आहे. एवढेच नाही तर ही कामगिरी करणारा तो एकमेव सक्रिय खेळाडू आहे.
विराट कोहलीपूर्वी सचिन तेंडुलकर (१४,१९२), रिकी पाँटिंग (१३,११७), जॅक कॅलिस (१२,३०५) आणि कुमार संगकारा (१२,०४३) यांनी घरच्या मैदानावर १२ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.
विराट कोहलीने २१९व्या सामन्याच्या २४३व्या डावात ही कामगिरी केली आहे. त्याने मायदेशात कसोटीत ४१६२* धावा, एकदिवसीय सामन्यांमध्ये ६२६८ धावा आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १५७७ धावा केल्या आहेत.
२४३ डाव - विराट कोहली
२६७ डाव - सचिन तेंडुलकर
२६९ डाव – कुमार संगकारा
२७१ डाव – जॅक कॅलिस
२७५ डाव - रिकी पाँटिंग
चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या डावात विराट कोहलीने ३७ चेंडूत १७ धावा केल्या. यादरम्यान त्याने २ चौकार मारले. मेहदी हसन मिराजने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले.
दरम्यान, विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकली तर या खेळाडूने ११३ सामन्यात ४९.१६ च्या सरासरीने ८८४८ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने कसोटी फॉरमॅटमध्ये २९ शतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने ३० अर्धशतकं केली आहेत.
तसेच विराट कोहलीच्या नावावर ७ द्विशतकांचा विक्रम आहे. वनडे फॉरमॅटमध्ये विराट कोहलीने ९३.५४ च्या स्ट्राईक रेटने आणि ५८.१८ च्या सरासरीने १४८६६ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने या फॉरमॅटमध्ये ५० शतके झळकावली आहेत. तर या फलंदाजाने ७२ वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे.
याशिवाय टी-20 फॉरमॅटमध्येही विराट कोहलीच्या बॅटने चांगली कामगिरी केली आहे. विराट कोहलीने १२५ टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या फॉरमॅटमध्ये विराट कोहलीने १३७.०४ च्या स्ट्राईक रेटने आणि ४८.७ च्या सरासरीने ४१८८ धावा केल्या आहेत.
विराट कोहलीने T20 फॉरमॅटमध्ये एकदाच शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. याशिवाय माजी भारतीय कर्णधाराने ३८ वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये विराट कोहलीची भारतासाठी सर्वोत्तम धावसंख्या अनुक्रमे २५४, १८३ आणि १२२ धावा आहेत.