जसप्रीत बुमराह याच्या धडाकेबाज गोलंदाजीपुढे बांगलादेश संघाने शरणागती पत्करली. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात १४९ धावांत गारद झाला. जसप्रीत बुमराहने ११ षटके टाकली आणि ४.५ च्या इकॉनॉमीसह ४० धावांत ४ बळी घेतले.
बुमराहशिवाय मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी २ बळी घेतले. बांगलादेशसाठी अनुभवी अष्टपैलू शकिब अल हसनने सर्वाधिक ३२ धावा केल्या.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेला भारतीय संघ पहिल्या डावात ३७६ धावांत आटोपला. प्रत्युत्तरात बांगलादेशची पहिल्या डावात खराब सुरुवात झाली. संघाला पहिला धक्का २ च्या स्कोअरवर बसला.
जसप्रीत बुमराहने शादमान इस्लामला बोल्ड केले. शादमान इस्लामने २ धावा केल्या. २२ धावांवर संघाची दुसरी विकेट पडली. आकाश दीपने झाकीर हसनला आपला शिकार बनवले. झाकीर हसनने ३ धावा केल्या.
यानंतर पुढच्याच चेंडूवर आकाश दीपने मोमिनुल हकला बोल्ड केले. हक शुन्यावर बाद झाला. कर्णधार नजमुल हुसेन शांतोने ३० चेंडूत २० धावा केल्या. सिराजने त्याला विराट कोहलीने झेलबाद केले. मुशफिकर रहीमने १४ चेंडूंचा सामना करत ८ धावांची खेळी खेळली. बुमराहने त्याची विकेट घेतली.
यष्टिरक्षक लिटन दासने ४२ चेंडूत २२ धावा केल्या. रवींद्र जडेजाने त्याची विकेट घेतली. जडेजाने शाकिबलाही आपल्या जाळ्यात अडकवले. त्याने ६४ चेंडू खेळून ३२ धावा केल्या.
बुमराहने घातक गोलंदाजी करत ४ बळी घेतले. त्याने ११ षटकात ५० धावा दिल्या. या काळात १ मेडन ओव्हरही टाकली. तर आकाश दीपने ५ षटकात १९ धावा देत २ बळी घेतले. या दोघांनी बांगलादेशचे कंबरडे मोडले. यानंतर सिराज आणि जडेजाने उर्वरित काम पूर्ण केले.
टीम इंडियाचे गोलंदाजी आक्रमण खूपच मजबूत दिसत होते. बुमराह आणि आकाश दीपसह, जडेजा आणि सिराज यांनीही चमत्कार केला. सिराजने १०.१ षटकात ३० धावा देत २ बळी घेतले. रवींद्र जडेजाने ८ षटकांत १९ धावा देत २ बळी घेतले.