India vs Australia Test News : बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियानं आपला संघ जाहीर केला आहे. जाहीर केलेल्या १४ खेळाडूंच्या चमूत टास्मानियाचा अष्टपैलू खेळाडू ब्यू वेबस्टर याचा समावेश करण्यात आला आहे. पर्थ कसोटीत जायबंदी झालेल्या मिशेल मार्शचा पर्याय म्हणून त्याला स्थान देण्यात आलं आहे.
ऑस्ट्रेलियाच्या सर्वात आश्वासक क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून ३० वर्षीय वेबस्टर अलीकडच्या काळात पुढं आला आहे. त्याला पहिल्यांदाच कसोटी पदार्पणाची मिळणार आहे. वेबस्टरला त्याच्या देशांतर्गत कामगिरीच्या जोरावर संघात स्थान मिळालं आहे. एक अष्टपैलू म्हणून तो संघात चांगली भूमिका बजावू शकतो.
कसोटी पदार्पणाच्या आधीच ब्यू वेबस्टरचं नाव क्रिकेट विश्वात गाजत आहेत. वेस्ट इंडिजचे दिग्गज सर गॅरी सोबर्स यांच्यानंतर एकाच मोसमात ९०० धावा आणि ३० विकेट्स घेण्याचा विलक्षण पराक्रम करणारा त्यानं केला आहे. शेफिल्ड शील्डच्या १३२ वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. गॅरी सोबर्स यांना क्रिकेटमधील महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानलं जातं. त्यामुळं वेबस्टरची ही कामगिरी जास्त महत्त्वाची ठरते.
वेबस्टरची अष्टपैलू कामगिरी टास्मानियासाठी महत्त्वाची ठरली आहे. २०२४-२५ च्या शेफिल्ड शील्ड मोसमात त्यानं आपण मॅच विनर असल्याचं दाखवून दिलं होतं. न्यू साऊथ वेल्सविरुद्ध खेळताना दोन महत्त्वपूर्ण बळी घेत त्यानं टास्मानियाचा पहिला विजय निश्चित केला. यंदाच्या उन्हाळ्यात त्यानं ५६ च्या सरासरीनं ४४८ धावा काढल्या आहेत. त्यात १६ बळींचाही समावेश आहे.
भारत अ संघाविरुद्ध वेबस्टरची कामगिरीही शानदार होती, आता त्याला अॅडलेड कसोटीत पदार्पणाची संधी मिळते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलंड, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), जोश हेजलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगलिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, ब्यु वेबस्टर