भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळली जात आहे. मालिकेतील दोन कसोटी सामने झाले असून मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. सध्या तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील गाबा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या क्रिकेट इतिहासातील पहिला सामना कधी खेळला गेला, हे तुम्हाला माहीत आहे का? भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटीत काय-काय घडलं हे आपण येथे पाहणार आहोत.
कसोटी क्रिकेट इतिहासातील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना (IND vs AUS) ७५ वर्षांपूर्वी खेळला गेला होता. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वातंत्र्य झाला. याच्या तीन महिन्यांनी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता.
भारतीय संघ येथे ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पोहोचला होता. या मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेन येथे झाला. भारतीय संघ इंग्लंडनंतर इतर कोणत्याही देशाविरुद्ध कसोटी सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ होती.
ब्रिस्बेन क्रिकेट मैदानावर २८ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या सामन्यात भारतीय संघाची कमान लाला अमरनाथ यांच्या हाती होती. तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्याकडे होते. या सामन्यात ब्रॅडमनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
कर्णधार ब्रॅडममनच्या १८५ धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ८ गडी गमावून ३८२ धावा करून डाव घोषित केला. ब्रॅडमन यांच्याशिवाय किथ मिलर (५८), लिंडसे हॅसेट (४८) आणि आर्थर मॉरिस (४७) यांनीही चांगली फलंदाजी केली. तर भारताकडून लाला अमरनाथ यांनी ४ आणि विनू मंकडने ३ बळी घेतले. चंदू सरवटेला एक विकेट मिळाली.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीनंतर भारतीय डावाला सुरुवात झाली तेव्हा पहिल्याच चेंडूवर विनू मांकड बाद झाला. सुरुवातच इतकी खराब झाली की गुल मोहम्मदही (०) बाद झाला. भारतीय संघाने आपले दोन विकेट शून्यावर गमावले होते.
यानंतर भारतीय फलंदाजांनी काही धावा करून डाव पुढे नेला. चंदू सरवटे (१२), विजय हजारे (१०) आणि लाला अमरनाथ (२२) यांच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. संपूर्ण भारतीय संघ अवघ्या ५८ धावांवर ऑलआऊट झाला.
येथे ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावातही भारतीय संघाची अवस्था वाईट राहिली. सलामीवीर चंदू सरवटे एका टोकाला राहिला आणि दुसऱ्या टोकाकडून विकेट पडत राहिल्या. संपूर्ण भारतीय संघ ९८ धावांत ऑलआऊट झाला.
सरवटे २६ धावा करून ९वी विकेट म्हणून पॅव्हेलियनमध्ये परतला. अशाप्रकारे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि २२६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
यानंतरच्या चारपैकी तीन कसोटी सामन्यांमध्येही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. अशा प्रकारे भारताने ही मालिका ०-४ अशी गमावली.
संबंधित बातम्या